रवी भोंगाने साकोली
साकोली :-१३ मे रोजी मुंबईतील घाटकोपर येथील वादळी पावसाने जाहिरा होर्डिंग कोसळून १४ जणांना प्राणाला मुकावे लागले. त्यानंतर विविध ठिकाणी जाहिरातीसाठी लावलेल्या होर्डिंगचा विषय प्रशासनाच्या ऐरणीवर आला. ही होर्डिंग केवळ शहरात नसून राज्य आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ रस्त्याच्या कडेला देखील आहेत. काही दिवसांपूर्वी चुलबंद नदीच्या तीरावर भले मोठे होर्डिंग लावण्यात आले. त्यामुळे हे होर्डिंग कुणाच्या मुळावर उठणार हा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. साकोली-वडसा या राष्ट्रीय महामार्गावर धर्मापुरी गावानाजिक चुलबंद नदीपात्र आहे. या चुलबंद नदीला काही महिन्यापूर्वी संरक्षणासाठी लोखंडी कठडे दोन्ही बाजूला लावण्यात आले. परंतु याच नदीच्या पुलावर काही दिवसांपूर्वी दोन होर्डिंग लावण्यात आले. विशेष म्हणजे या पुलावरून जाता येतांना वळण घेऊन जावे लागते. हा रस्ता वळणदार आहे. त्यामुळे फलकावरील जाहिरातीने वाहन चालकाचे लक्ष वेधले आणि क्षणात काही घात झाला तर त्याला जबाबदार कोण ? अगदी पुलाला लागून ही होर्डिंग लावण्यात आली आहेत. रस्त्यावरील जाहिरातीचे होर्डिंग हे वाहन चालकांना विचलित करीत असतात. अशावेळी चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून दुर्घटना होण्याची शक्यता असते. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लावलेले रस्त्यावरील फलक जीवघेणी ठरू शकतात. त्यामुळे चुलबंद नदीच्या पुलावर लावण्यात आलेले होर्डिंग कुणाच्या मुळावर उठणार ? अगदी पूलाला लागून हे होर्डिंग लावल्याने जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची ? या पुलावर होर्डिंग लावण्याची अधिकृत परवानगी घेण्यात आली काय ? उद्या या होर्डिंग्समुळे जीवित हानी जर झाली तर हा विभाग त्याची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारणार काय? मुंबईच्या घटनेनंतर राज्य शासनाने राज्यभरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढण्याचे निर्देश दिले. असेच निर्देश रस्ते विकास महामंडळा देणार काय ?


0 टिप्पण्या