रवी भोंगाने साकोली
साकोली:-महिला आर्थिक विकास महामंडळ शासन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. सदर मंडळ स्थापन झाल्यापासून गावागावात महिला बचत गटाचे जाळे पसरले. त्यानंतरच बचत गटाचा लाभ गावातील महिलांना झाला. पुनश्च शासनाने बचत गटाला प्रोत्साहन दिले असून शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशातून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटाला नव्याने रोजगार मिळणार आहे. या बचत गटाद्वारे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या ८१४ शाळांचे गणवेश शिवले जाणार आहेत. या निमित्ताने बचत गटातील महिलांच्या रोजगारात भर पडणार आहे. यंदा गणवेश शिवण्याची प्रक्रिया राज्यस्तरावर पूर्ण झाली असून जिल्ह्यातील ६१,४१४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ गणवेश शिऊन मिळणार आहेत.
यानिमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या गणवेश अधिकारावर शासनाकडून वरवंटा फिरवला गेला. याआधी शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाचे अधिकार असायचे. मात्र शासनाच्या या नव्या धोरणाने शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारावर गदा आली आहे. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती मार्फत गणवेश खरेदी केले जात होते. त्यामुळे पदधिकाऱ्यांचा हस्तक्षेपही वाढला होता. मात्र हे अधिकार आता गोठवण्यात आले. सदर गणवेश महिला बचत गटाकडून शिवून घेतांना त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या मापांचे गणवेश यांचे कापड कटिंग करून बॅच क्रमांकासह देण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या