Ticker

6/recent/ticker-posts

रॉयल्टीची रक्कम भरण्याआधीच पाकन मातीचे उत्खनन व वाहतूक


• किन्ही मिश्र रोपवनातील प्रकार, क्षेत्र सहाय्यकाचा अफलातून कारभार 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- महसूल विभागाची परवानगी घेतल्याशिवाय गौण खनिज उत्खनन करू नये. असा नियम असला तरी यास तत्कालीन उमरझरी सहवनक्षेत्राचे प्रभारी क्षेत्र सहाय्यक राकेश कोदाने यांनी तिलांजली देऊन किन्ही मिश्र रोपवनासाठी लागणारी पाकन मातीचे जून २०२३ मध्ये उत्खनन व वाहतूक करून रोपवनाचे खड्डे बुजविण्यात आले. पण रॉयल्टी मात्र सप्टेंबर २०२३ मध्ये भरण्यात आल्याचे वास्तव समोर आले असल्याने क्षेत्र सहाय्यकाने शासकीय रक्कम अडीच महिने आपल्या जवळ बाळगली कशी ? तसेच नियमबाह्य पाकन माती उत्खनन प्रकरणी महसूल विभाग दंडाची रक्कम आकारणार आहे काय ? असा प्रश्न निर्माण होत असून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या गौडबंगालाची चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी होत आहे. 
               अवैध वृक्षतोडीमुळे वनक्षेत्र नामशेष होण्याचे मार्गावर असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मार्गावर आहे. या प्रकाराने अतिवृष्टी, केव्हा केव्हा अवर्षण तर ग्लोबल वॉर्मिग सारख्या समस्यांना मानवाला सामोरे जावे लागत आहे. वनक्षेत्रात वाढ करण्यासाठी वन विभागाचे अखत्यारीत असलेल्या पडीक जागेवर वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढीसाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त सहवनक्षेत्र उमरझरी अंतर्गत असलेल्या वनरक्षक बीट चांदोरी मधील किन्ही येथील झुडपी जंगल गट क्रमांक ४५०, ४५१ मधील १५ हेक्टर जागेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्य योजना वनिकरणाचा भरगच्च कार्यक्रम अंतर्गत मिश्र रोपवन लागवडीस मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यात १६ हजार ६६५ रोपे वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, प्रभारी क्षेत्र सहाय्यक राकेश कोदाने यांचे मार्गदर्शनात चांदोरी बीटाचे वनरक्षक नितीन उशीर यांचे देखरेख व सनियंत्रणात मिश्र रोपवन लागवडीपूर्वी खड्डे खोदकाम करण्यात येऊन रोपांची योग्य रीतीने वाढ व्हावी. या करिता पाकन मातीचे साहाय्याने अर्धे खड्डे बुजविण्याचे प्रयोजन होते. या करिता १०६ ब्रास पाकन मातीची आवश्यकता असल्याने मिश्र रोपवन अंदाजपत्रकात नमूद आहे. 
                   रोपे वाहतुकीची प्रशासकीय मंजुरी मिळण्याआधीच ८ जुलै ते १३ जुलै २०२३ या कालावधीत रोपे वाहतूक दाखविण्यात आली. किन्ही येथील रोपवनात खड्डे बुजविण्यासाठी १४ सप्टेंबर २०२३ रोजी पाकन मातीसाठी रॉयल्टी भरण्यात आली. पण तत्पूर्वीच ३० जून २०२३ ला वाहतूक केल्याचे दाखवून खड्डे मात्र १५ मे ते १८ जून २०२३ पर्यंत बुजविल्याचे व्हाउचर पास करण्यात आले असल्याने तारखांचा ताळमेळ जुळत नसल्याचे यावरून दिसून येते. तत्कालीन प्रभारी क्षेत्र सहाय्यक राकेश कोदाने यांचे नावाने ३० जून २०२३ रोजी रॉयल्टीची रक्कम २५ हजार ४४० रुपयाचा व्हाउचर तसेच वाहतूकदारास देय रक्कम ६३ हजार ९६० रुपयाचा एकाच दिवशी व्हाउचर पास करण्यात आले. मात्र तब्बल अडीच महिन्यांनी रॉयल्टी ची रक्कम भरण्यात आली. तर वाहतूकदाराला देय रकमेचा धनादेश किंवा वाहतूकदाराचे बँक खात्यात रक्कम जमा करणे गरजेचे असताना तत्कालीन प्रभारी क्षेत्र सहाय्यक राकेश कोदाने यांचे नावाने व्हाउचर पास केल्याने सदर व्यवहार शंकास्पद तथा नियमबाह्य असल्याचे दिसून येते. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी किन्ही मिश्र रोपवनाकरिता पाकन माती वाहतूक प्रकरणाची चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या