• अनेक गावात अवैध व्यवसाय सुरू
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- गावातून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे. तथा आपसी सहमतीने भांडणतंटे सोडविण्याकरिता स्थापन करण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती पदाधिकाऱ्यांचे शासनाने निमुन दिलेल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण परिसरात अवैध व्यवसाय फोफावल्याने गावाचे आरोग्य बिघडण्याचे मार्गावर असल्याने तंटामुक्त समित्यांना विसर पडला कर्तव्याचा अशा चर्चांना पेव फुटले आहे.
ग्रामीण परिसरात उद्भवणाऱ्या भांडणाच्या निराकरणासाठी न्यायालयाचा आश्रय घ्यावा लागत असल्यामुळे यात ग्रामीण जनतेचा वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. त्यामुळे ग्रामीण जनतेला अकारण त्रास सहन करावा लागत असे. आपसी सहमतीतून किरकोळ स्वरूपाचे भांडणतंटे सोडविले जावे. याकरिता तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून २००७ पासून "महात्मा गांधी तंटामुक्त गाव" अभियानास सुरुवात झाली. या अभियानाचा मुख्य उद्देश गावातून अवैध व्यवसायाचे उच्चाटन करणे. आपसी सहमतीने भांडणतंटा सोडविणे. गावाच्या सिमेतील शासकीय जागांवर अतिक्रमण होणार नाही. याची काळजी घेणे. गावातील शासकीय इमारतीचे विद्रुपीकरण थांबविणे. असे ह्या समितीचे कामकाज होते.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा कार्यकाळ हा वर्षभराचा ठरवून ग्रामसभेतून समितीची निवड करण्यात यावी. गावातील निर्व्यसनी सामाजिक कार्यकर्ता समितीचा अध्यक्ष याशिवाय ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच पदसिद्ध सदस्य तथा गावात कार्यरत लोकसेवक , प्रभावी व्यक्ती, आशा कार्यकर्ती यांचा समावेश असावा. समितीच्या सदस्य संख्येपैकी ५० टक्के महिला असाव्यात असे बंधन टाकण्यात आले होते. तंटामुक्त समितीचे निमंत्रक पोलिस पाटील अशी समितीची रचना होती. सर्वच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात तंटामुक्त गाव समितीने अवैध व्यवसायिक व व्यवसायावर वचक निर्माण करून पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने आळाही घातला होता. त्यामुळे ग्रामीण परिसरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित झाली होती.
मार्च २०२० पासून कोविड-१९ ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून ग्रामसभांना स्थगिती दिली गेल्यामुळे ग्रामसभा झाल्याच नाही. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत केली गेली नाही. पण ऑगस्ट २०२२ पासून अनेक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे गठण करण्यात आले. तर काही गावातील समित्यांना मुदतवाढ देण्यात आली असली तरी समितीचे कामकाज थंड्याबस्त्यात असल्याने याचा गावातील अवैध व्यवसायिकांनी फायदा उचलला असून अनेक गावात अवैध मोहफुल व देशी दारूची वाहतूक आणि अवैध विक्री सुरू झाली. तसेच अवैध सट्टा व्यवसायासही सुरुवात झाली आहे. गावात तळीरामांचा त्रास वाढल्यामुळे शांतता भंग होऊन अकारण भांडणतंटे होत आहेत. तथा विद्यार्थी व्यसनाधीन होण्याचे मार्गावर असल्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना विसर पडला कर्तव्याचा अशा चर्चा होत आहेत.


0 टिप्पण्या