Ticker

6/recent/ticker-posts

अखेर.... ग्रामपंचायतीने लेआऊट मधील रस्त्यावरील "ते" अतिक्रमण काढले


• गडेगाव गट क्रमांक ५३/२ मधील प्रकार 

• सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणे आले अंगलट 


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील गडेगाव तलाठी साझा क्रमांक २ मधील गट क्रमांक ५३/२ अकृषक भूखंडाचा निवासी प्रयोजनार्थ वापर करणे आवश्यक असताना प्लॉटधारक सुखदेव उर्फ राजेश मस्के याने महसूल प्रशासनाची परवानगी न घेता दुकान गाळे व इतर बांधकाम केले. त्यानंतर या आठही प्लॉट चे उपविभागीय महसूल अधिकारी साकोली यांचेकडून एकत्रीकरण केले. पण या प्लॉट मध्यभागातून जाणारा  ग्रामपंचायतीच्या मालकीचा सार्वजनिक रस्ता सोडला नव्हता. त्यामुळे ग्रामपंचायत गडेगाव ने तहसीलदार लाखनी यांचे आदेशान्वये स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कडेकोट पोलिस बंदोबस्तात गट क्रमांक ५३/२ मधील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण बुधवार(ता.७ ऑगस्ट) रोजी जेसीबी चे साहाय्याने हटविण्यात आले. यावेळी बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.
                        मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) वर वसलेल्या गडेगाव येथे अशोक लेलँड कंपनी समोर गट क्रमांक ५३/२ मध्ये निवासी प्रयोजनार्थ अकृषक करण्यात आल्याने सुखदेव उर्फ राजेश मस्के व नातेवाईकांनी ८ प्लॉट खरेदी केले होते. या प्लॉट चे मध्यभागातून रस्ता तर दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे महामार्गाचे मध्याभगापासून दोन्ही बाजूस विशिष्ट अंतर ठेवून बांधकाम करावे. अशा अकृषक आदेशात स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्या तरी सुखदेव उर्फ राजेश मस्के व नातेवाईकांनी निवासी प्रयोजनार्थ प्लॉट चा वापर न करता तसेच महसूल विभागाची कसलीही परवानगी न घेता दुकान गाळे बांधकाम, सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण, सार्वजनिक वापराच्या(ओपन स्पेस) जागेवर वॉटर पार्क व इतर बांधकाम तसेच लगत चे गट क्रमांक ५८ वर अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला होता. या बाबद शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत गडेगावकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच एका महिलेने तहसीलदार लाखनी यांचेकडे तक्रार केल्याने स्थानिक तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकरवी चौकशी करण्यात आली. त्यात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्याने बांधकाम थांबविण्यात आले होते. 
                          सुखदेव उर्फ राजेश मस्के आणि नातेवाईकांचे ताब्यात ८ प्लॉट होते. त्यांचे मध्यभागातून २० फुटाचा सार्वजनिक रस्ता होता. सदर आठही प्लॉट उपविभागीय महसूल अधिकारी साकोली यांचे आदेशान्वये २ फेब्रुवारी २०२४ रोजी एकत्रीकरण करण्यात आले. तथा तलाठी साझा क्रमांक २ गडेगाव यांनी फेरफार क्रमांक ३९९४ दिनांक १५ मार्च २०१४ अन्वये फेरफार घेण्यात आला. या प्लॉटचे मध्यभागातून सार्वजनिक रस्ता असल्यामुळे ग्रामपंचायतीची मालकी होती. या रस्त्यावरून आजूबाजूचे शेतकरी जात असत पण सुखदेव उर्फ राजेश मस्के याने त्यांचे ताब्यातील प्लॉट चे दर्शनी भागात महामार्गालगत तारेचे कुंपण आणि गेट लावून रस्ता बंद केला होता. या बाबद शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला सूचना केली होती. 
                         गट क्रमांक ५३/२ मधील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीचे वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे प्रस्ताव दाखल केला होता. तसेच ग्रामपंचायत गडेगाव ने ग्रामसभेचे आयोजन केले होते. तहकूब ग्रामसभेत गट क्रमांक ५२/३ मधील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे. असा ठराव पारित करण्यात आला होता. तर ग्रामपंचायतीने सदर अतिक्रमण हटवावे असे तहसीलदार लाखनी यांनी आदेश दिल्यामुळे ग्रामपंचायतीने पोलिस संरक्षणात बुधवारी(ता.७ ऑगस्ट) रोजी दुपारचे सुमारास अतिक्रमण हटविण्यात सुरू केली. पण अतिक्रमण धारक जेसीबी समोर आल्याने व्यत्यय निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून अतिक्रमण धारकास बाजूला केले व जेसीबी च्या साहाय्याने गट क्रमांक ५३/२ मधील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा रेहपाडे, ग्रामसेवक एस. के. गायधने, पंचायत समिती सदस्य मनीषा हलमारे, उपसरपंच प्रमोद कुथे, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी चाचेरे, तलाठी कु. राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे, सामाजिक कार्यकर्ते बबलू कच्छवाय, ग्रामपंचायत कर्मचारी आणि बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या