Ticker

6/recent/ticker-posts

शिवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील संचालकांच्या अपहाराबाबत आरबीआय सह सहकार आयुक्त करणार चौकशी

संजय देशमुख चित्रा न्युज
सोलापूर -: शिवशक्ती अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड, बार्शी या सहकारी बँकेतील संचालक मंडळाने ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या आरोपांवर भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर करताना महाराष्ट्र ठेवीदाराच्या हिताचे संरक्षण अधिनियम 1999 आणि सहकारी बँक कायदा यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे.

संचालक मंडळाने बनावट कर्ज प्रकरणे तयार करून, कर्जदारांच्या नावावर मोठ्या रकमेचे कर्ज दाखवून खोटे कागदपत्र तयार केले. कर्ज प्रकरण करताना कर्जदाराची पत आणि कर्ज देण्याची मर्यादा ओलांडून कर्ज दिले गेले. तसेच, कर्जाच्या सुरक्षेकामी घेतलेली सुरक्षा अपुरी असल्याने ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित झाल्या आहेत. लेखापरीक्षण अहवालात खोटे आणि लबाडीचे आकडे नमूद करून हे अपहार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सन 2020 ते 2023 या आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालात संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत नमूद केले आहे. स्थानिक आमदार, नातेवाईक आणि त्यांच्या हितसंबंधितांना कोट्यावधी रुपयांची कर्जे दिली असून या कर्जाकरिता आवश्यक तारण घेतले नाही. संचालक मंडळाने ठेवीदारांचा विश्वासघात करून स्वतःला आणि इतरांना गैरलाभ मिळवून दिला आहे.

या बेकायदेशीर कृत्याबाबत विकास कुचेकर, अध्यक्ष मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, महाराष्ट्र; मनिष देशपांडे, महाराष्ट्र सचिव; आकाश दळवी, बार्शी तालुक्याचे अध्यक्ष; दिनानाथ काटकर, माहिती अधिकार कार्यकर्ते; आणि अण्णा मंजुळे, महाराष्ट्राचे संघटक यांनी सहकार आयुक्त आणि भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती दिनानाथ काटकर यांनी दिली.

बँकेच्या ठेवीदारांनी आर्थिक लेखापरीक्षण अहवालाचा नीट अभ्यास केला असता, तर बँकेच्या सुशिक्षित ठेवीदारांनी संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कृत्याबाबत वेळीच आवाज उठवला असता आणि बँकेवर ही वेळ आली नसती. संचालक मंडळाने लोकांच्या ठेवी स्वरूपात कष्टाने कमावलेल्या रकमेचा अपहार करून त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याने, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था या प्रकरणात पाठपुरावा करत राहणार आहे.

विकास कुचेकर
अध्यक्ष, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, महाराष्ट्र
संपर्क: 7276734190

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या