• लाखनीत १७ पैकी ४ कामे पूर्ण
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- शेत पांदन रस्त्याच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील असले तरी सरकारी विभागात समन्वयाच्या अभावामुळे वेळेवर कामे पूर्ण होत नाही. याचा प्रत्यय मातोश्री शेत पांदन योजनेत आला. या योजनेत निधीची व्यवस्था मनरेगा व राज्य रोहयो मधून करण्यात आली असली तरी शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना प्रमाणे ठरवून दिलेल्या कालावधीत निधी उपलब्ध केला जात नसल्यामुळे लाखनी तालुक्यात १७ पैकी ४ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरूच झाली नसल्यामुळे शेतकरी हिताचा विचार करून मातोश्री शेत पांदन योजनेत सुसूत्रता आणणे आवश्यक आहे.
शेतात जाणारे पांदन रस्ते पूर्णतः दुर्लक्षित झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. या प्रकाराने शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तथा वेळेवर खरीप हंगामातील शेतीची कामे होत नाही. ही बाब शासनाचे निदर्शनास आल्याने मनरेगा व राज्य रोहयो चे माध्यमातून शेत पांदन रस्त्याचा कायापालट करण्यासाठी मातोश्री शेत पांदन योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सध्याचे युग हे यांत्रिक युग असल्यामुळे शेतीची कामे पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामे यंत्राचे साहाय्याने केली जातात. यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता. या शिवाय बारमाही वापराकरिता शेत पांदन रस्त्याचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. पांदन रस्ते प्रमाणित दर्जाचे व्हावेत या करिता २०१८ मध्ये पालकमंत्री शेत पांदन योजनेस सुरुवात करण्यात आली. महाविकास आघाडीचे कार्यकाळात या योजनेचे "मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन योजना" असे नामकरण करण्यात आले.
मातोश्री शेत पांदन योजनेअंतर्गत लाखनी तालुक्यात रेंगोळा- २, मोगरा- २, किटाडी- १, गोंदी- १, वाकल- १, पिंपळगाव/सडक- १, डोंगरगाव/साक्षर- १, खराशी- १, रेंगेपार/कोहळी- १, लाखोरी- ३, सालेभाटा- २, सोमलवाडा- १ अशी एकूण १७ खडीकरणाची कामे मंजूर करण्यात आली. त्या पैकी रेंगोळा- १, मोगरा- २, किटाडी- १ अशी ४ कामे पूर्णत्वास आली असून गोंदी, वाकल, पिंपळगाव, सोमलवाडा येथील कामे अपूर्ण तर उर्वरित कामे सुरू झालीच नाही. त्यामुळे शासनाचा उद्देश साध्य होईल काय ? असा शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. मातोश्री शेतपांदन योजनेचा आराखडा ग्रामपंचायत स्तरावरून जाणे अपेक्षित असताना मध्यस्तांच्या मदतीने मंत्रालय स्तरावरून मातोश्री शेतपांदन योजनेची कामे मंजूर करवून आणली जातात. यात मोठे अर्थकारण होत असल्याच्या चर्चा होत आहेत. शासनच मार्गदर्शक तत्त्व निश्चित करीत असताना शासनाकडूनच मंत्रालय स्तरावर अवहेलना होत आहे. यात २ विभागाद्वारा निधी वेळेवर उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे मातोश्री शेतपांदन योजनेची कामे रेंगाळली आहेत. या करिता मंजूर कामांचा पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. या शिवाय या रस्त्यांचे कामास गती येणार नाही.
ह्या रस्त्यांचे बळकटीकरण होणार
मातोश्री शेत पांदन योजनेअंतर्गत एका गावावरून दुसऱ्या गावास जाणारे रस्ते, शेतावर जाण्याचे पायी मार्ग व गाडी मार्ग, अस्तित्वातील शेत पांदन कच्च्या रस्त्याचे मजबुतीकरण, शेत पांदन रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे इत्यादी रस्त्याची कामे या योजनेतून घेण्यात येतील.
अशी असेल निधीची व्यवस्था
मातोश्री शेत पांदन योजनेअंतर्गत १ किलोमीटर रस्त्याचे खडीकरण करण्यात येणार असून या करिता अपेक्षित खर्च २३ लाख ८४ हजार ८५६ रुपये आहे. त्यात मनरेगा अकुशल ९ लाख २ हजार ८७९, मनरेगा कुशल ६ लाख १ हजार ९१९ आणि राज्य रोहयो कुशल ८ लाख ८० हजार ५८ रुपये. अशी निधी उपलब्ध केली जाणार आहे.


0 टिप्पण्या