शिवणी/मोगरा येथील प्रकार
अंदाजपत्रकात दर्शविल्या प्रमाणे साहित्याचा वापर नाही
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे फलनिष्पत्ती होत नाही. याचा प्रत्यय शिवणी/मोगरा, तालुका लाखनी येथे आले. लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत तयार करण्यात येणारे सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात अंदाजपत्रकात दर्शविल्यानुसार साहित्याचा वापर केला गेला नसल्यामुळे सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम झाकणासह निकृष्ट प्रतीचे झाले आहे. या बांधकामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करणे गरजेचे झाले आहे.
मौजा शिवणी/मोगरा येथून जाणाऱ्या पिंपळगाव/सडक-मुरमाडी/तूप-खराशी ह्या ग्रामीण मार्गावरील पावसाचे पाणी तसेच नरेश नागलवाडे ते गायधनी यांचे घरालगत सांडपाण्याची योग्य रीतीने विल्हेवाट होत नसल्यामुळे या भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकास गैरसोयीचे ठरत असे. सांडपाण्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात यावी या गावकऱ्यांच्या मागणीवरून काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत ५ लक्ष रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या सिमेंट काँक्रिट नाली झाकणासह बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असून यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली यांचे मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंत्याकडे सोपविण्यात आले होते.
करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असला तरी टक्केवारीने हे सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम झाकणासह सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्यास देण्यात आले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या पदाधिकाऱ्याने आपले कोणी काही बिघडवू शकत नाही या तोऱ्यात अंदाजपत्रकात दर्शविल्या मात्रे प्रमाणे साहित्याचा वापर न करता काळ्या गिट्टी ऐवजी पांढऱ्या गिट्टीचा वापर केला. ही बाब कनिष्ठ अभियंत्याचे निदर्शनास आल्याने नाली बांधकाम तोडण्याची कंत्राटदारास सूचना केली होती. पण नाली बांधकाम न तोडता कनिष्ठ अभियंता रजेवर गेल्याची संधी साधून पुन्हा नाली बांधकाम करण्यात आल्याचे नाव न छापण्याचे अटीवर एका गावकऱ्याने कनिष्ठ अभियंत्यास सांगितल्याने कनिष्ठ अभियंत्याने कंत्राटदाराची चांगलीच कान उघडणी केली असल्याचे विश्वसनीय वृत्त असले तरी अंदाजपत्रकात दर्शविल्या मात्रे प्रमाणे सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात साहित्याचा वापर केला गेला नसल्यामुळे काम निकृष्ट प्रतीचे झाले आहे. या बांधकामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या