Ticker

6/recent/ticker-posts

अखेर..."त्या" तारेच्या कुंपण दुरुस्तीचे काम सुरू

• ६ महिन्यातच कुंपण झाले होते जमीनदोस्त 

• दखल चित्रा न्युज च्या वृत्ताची


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या सहवनक्षेत्र व वनरक्षक बीट जांभळी/सडक अंतर्गत सोनपुरी मिश्र रोपवनाचे सभोवताल करण्यात आलेले तारेचे कुंपण नादुरुस्त असल्याचे चित्रा न्युज मध्ये २३ सप्टेंबर चे अंकात "मिश्र रोपवन सभोवतालच्या तारेचे कुंपण ६ महिन्यातच जमीनदोस्त" या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित होताच कंत्राटदारासह वन विभाग खडबडून जागा झाला व आपले कृष्णाकृत्य लपविण्यासाठी युद्ध पातळीवर तारेचे कुंपण दुरुस्तीचे काम सुरू असले तरी काम निकृष्ट प्रतीचे करण्यात आल्याने कंत्राटदारासह संबंधित वन कर्मचारी व अधिकाऱ्यावर वरिष्ठ वन अधिकाऱ्यानी कारवाई करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे निकृष्ट कामावर पायबंद होण्यास मदत होईल.  
                    अवैध वृक्षतोडीने वनक्षेत्रात सातत्याने घट होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मार्गावर आहे. या प्रकाराने कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती चे परिणाम मानवाला भोगावे लागत आहेत. यावर मात करता यावी. यासाठी वन विभागाचे अखत्यारीतील पडीक जागेत रोपवन लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त सहवनक्षेत्र तथा वनरक्षक बीट जांभळी/सडक अंतर्गत सोनपुरी येथील गट क्रमांक ||| संरक्षित वनात राज्य योजना वनिकरणाचा भरगच्च कार्यक्रमाद्वारे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १५ हेक्टर क्षेत्रात मिश्र रोपवनास मंजुरी प्रदान करण्यात आली. तांत्रिक मंजुरी क्रमांक स.व.स./रोहयो-०९ दिनांक २०/६/२०२२ तर प्रशासकीय मान्यता क्रमांक उवंस/भंडारा-१२ दिनांक २३/६/२०२२ आहे. 
                   वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक एस.बी. उईके तथा वनरक्षक के.एस. वंजारी यांचे सनियंत्रण व देखरेखीखाली मिश्ररोपवन लागवड करण्यात आली होती. मिश्ररोपवनाची मंजुरी २०२२ मधील असली तरी लागवड मात्र जून-जुलै २०२३ मध्ये करण्यात आली असून या मिश्र रोपवनात १५ हेक्टर जागेत सागवन, आवळा, जांभूळ, आजन, चिंच, बेल, निंब, मोह, खैर, आंबा इत्यादी प्रजातीच्या १६ हजार ६६५ रोपांची लागवड करण्यात आली आहे. पाळीव अथवा वन्य प्राण्यांकडून रोपवनाचे नुकसान होऊ नये. या करिता संरक्षणासाठी या मिश्र रोपवनाचे सभोवताल तारेचे कुंपण तयार करण्याकरिता उपवनसंरक्षक भंडारा यांचेकडून निविदा काढण्यात आली. कमी दराची निविदा असल्यामुळे एका मजूर सहकारी संस्थेस तारेच्या कुंपणाचे काम देण्यात आले होते. 
                    ह्या मिश्र रोपवनासभोवताल तारेच्या कुंपणाचे काम मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले असले तरी टक्केवारीने हे काम साकोली येथील कंत्राटदाराला देण्यात आले. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, क्षेत्र सहाय्यक एस.बी. उईके तथा तत्कालीन वनरक्षक के. एस. वंजारी यांचेकडे सोपविण्यात आले होते. वन अधिकारी व कर्मचाऱ्याशी पेटी कंत्राटदाराने संगनमत करून तार कुंपण कामात नाममात्र खड्डे खोदणे व साहित्याचा अल्प प्रमाणात वापर केल्याने ६ महिन्यातच सप्टेंबर २०२४ मध्ये सोनपुरी मिश्र रोपवन सभोवतालच्या तारेचे कुंपण जमीनदोस्त झाले आहे. या प्रकाराने या तार कुंपण कामाचे गुणवत्तेबाबद प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कंत्राटदारासह वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचेकडून या तार कुंपणासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम वसूल करणे आवश्यक झाले आहे. असे चित्रा न्युज मध्ये वृत्त प्रकाशित होताच वन विभाग खडबडून जागा झाला. तथा मिश्र रोपवन सोनपुरी चे सभोवताल जमीनदोस्त झालेले तारेचे कुंपण दुरुस्तीचे काम मजूरांकरवी सुरू करण्यात आले आहे.चित्रा न्युज 
 ह्या एकमेव वृत्तपत्राने रोपवन सभोवताल तारेचे कुंपण कामात झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या