Ticker

6/recent/ticker-posts

छाननी लिपिक व मुख्यालय सहाय्यक एसीबी चे जाळ्यात

• भूमी अभिलेख कार्यालय साकोली येथील प्रकार 

• १५ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- जुन्या पत्रावरून मोजणी करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा चे पथकाने रचलेल्या सापळ्यात भूमी अभिलेख कार्यालय साकोली येथील छाननी लिपिक व मुख्यालय सहाय्यकास १५ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याची घटना शुक्रवार(ता.२७ सप्टेंबर) रोजी घडली. आरोपींची नावे छाननी लिपिक प्रवीण फुलचंद गिरेपुंजे(३३) आणि मुख्यालय सहाय्यक राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर(४३) अशी आहेत. वृत्त लिहीपर्यंत साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. २०२४ मधील ही ८वी सापळा कारवाई आहे. 
                   तक्रारदाराची साकोली तालुक्यातील जांभळी येथे भुमपान क्रमांक ३७७ मध्ये ०.५१ हेक्टर शेती आहे. ही शेती निवासी प्रयोजनाकरिता व टी.पी. करिता तक्रारकर्त्याने २९ मार्च २०१३ रोजी भंडारा येथील नगर रचनाकार यांचेकडे अर्ज केला होता. भंडारा नगररचना कार्यालय भंडारा यांनी तक्रारदार यांचे अर्जावर कारवाई करून पुढील कारवाई करिता तहसीलदार साकोली व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय साकोली यांचेकडे पाठविले होते. तक्रारदाराने १६सप्टेंबर २०२४ रोजी साकोली भूमी अभिलेख कार्यालय साकोली येथे नकाशाच्या मोजणीसाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार १७ सप्टेंबर रोजी साकोली भूमी अभिलेख कार्यालयात गेले व छाननी लिपिक गिऱ्हेपुंजे यांना भेटून भंडारा नगर रचनाकार यांनी केलेल्या शिफासीप्रमाणे प्लॉट ची मोजणी करण्याबाबत विचारणा केली असता नगर रचनाकार यांचे पत्र जुने आहे, ते चालणार नाही असे सांगितले. व नवीन पत्र आणावे लागेल असे तक्रारदारास बोलले. तक्रारदार यांनी आरोपीस मोजणी करून देण्याची पुन्हा विनंती केली असता छाननी लिपिक व मुख्यालय सहाय्यक यांनी एकमेकांशी चर्चा करून तक्रारदाराकडे २० हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने २५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा कडे तक्रार केली. २६ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने शुक्रवारी सापळा रचून पंचासमक्ष १५ हजाराची लाच घेतांना रंगेहात छाननी लिपिक प्रवीण फुलचंद गिरेपुंजे व मुख्यालय सहाय्यक राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर यांना पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, पोलिस नायक अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, नरेंद्र लाखडे, पोलिस शिपाई राजकुमार लेंडे, शिलपेंद्र मेश्राम, चेतन पोटे, मयूर शिंगणजुडे, विष्णू वरठी, चालक पोलिस शिपाई राहुल राऊत, महिला पोलिस शिपाई अभिलाषा गजभिये यांनी सापळा कारवाई केली. वृत्त लिहीपर्यंत साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. २०२४ मधील ही ८वी सापळा कारवाई आहे. 
*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन(चौकट)*
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम(एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांचेशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०७१८४-२५२६-६१ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या