• पहाडी येथील रेती माफियाचे नेतृत्वात होते रेती तस्करी
• १० ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे होते रेती वाहतूक
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी येथील स्थानिक महसूल कर्मचाऱ्याचा मुख्यालयास खो तसेच स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने पहाडी येथील एका कुख्यात रेती तस्कराचे नेतृत्वात कवडसी, खराशी व भूगाव येथील विना क्रमांकाच्या १० ते १२ ट्रॅक्टर ट्रॉली चे साहाय्याने मजूरांकरवी विहिरगाव(कन्हाळ्या) रेती घाटातून रात्रीचे सुमारास रेती उपसा करून ओव्हरलोड रेती वाहतूक बिनबोभाट सुरू असून पिंपळगाव/सडक, पोहरा व लाखनी पर्यंत अवैध रेती वाहतूक होत असताना महसूल व पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याने यांचे आशीर्वादानेच रेती तस्करी होत असल्याचा आरोप कोलारी परिसरातील नागरिकांकडून होत असून वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून अवैध रेती वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.
लाखनी तालुक्यातून चुलबंद नदी दक्षिणोत्तर प्रवाहित होत असून या नदीमुळे साकोली व लाखांदूर तालुक्याची सीमा निश्चित करण्यात आली आहे. सध्या चुलबंद नदीचे पाण्याची धार बंद झाल्यामुळे बरेचसे नदीपात्र कोरडे झाले आहे. या नदीपात्रात बारीक पांढरी शुभ्र दर्जेदार रेती असल्यामुळे बांधकाम व्यवसायात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. ही बाब हेरून रेती माफिये स्थानिक महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हळूहळू सक्रिय होत असल्याचे चित्र लाखनी तालुक्यातील मिरेगाव(कन्हाळ्या) रेती घाटावर दिसत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका ग्रामस्थाने सांगितले.
सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत नदी पात्रातून रेतीचा उपसा करू नये. असा नियम असला तरी यास तिलांजली देऊन पहाडी येथील एका कुख्यात रेती तस्कराचे नेतृत्वात कवडसी, खराशी व भूगाव येथील विना क्रमांकाच्या १० ते १२ ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे रात्रभर ते दुपार पर्यंत खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरू आहे. पहाडी येथील कुख्यात रेती तस्कर मुरमाडी/तूप येथे वास्तव्यास असल्याने त्याला या परिसरातील रस्त्यांची खडानखडा माहिती आहे. तसेच या रेती तस्कराचे हस्तक चौरस्ते व मौक्याचे ठिकाणी खडापाहारा देत असल्यामुळे प्रशासनाचे हालचालीची माहिती होऊन अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर इतर रस्त्यावर वळते केले जातात. असे नाव न छापण्याचे अटीवर एका ट्रॅक्टर चालकाने सांगितले.
या कुख्यात रेती तस्काराचे पोलिस व महसूल विभागात काही हस्तक कार्यरत असल्यामुळे या विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंगवर निघाल्याची माहिती दिली जात असली तरी नदी घाटापासून १५ ते २० किलोमीटर पिंपळगाव, पोहरा, लाखनी या अवैध रेती वाहतूक होत असताना रस्त्यात अनेक तलाठी साझे तथा पालांदूर व लाखनी पोलिस ठाण्याची हद्द येत असताना ही अवैध रेती वाहतुकीची बाब कशी निदर्शनास आली नाही. हा चिंतनाचा विषय झाला आहे. अथवा वरची कमाई बंद होण्याचे भीतीपोटी या गंभीर बाबीकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे. हे कळण्यास मार्ग नाही. वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची स्वतः दखल घेऊन चुलबंद नदी पात्रातील विहिरगाव(कन्हाळ्या) रेती घाटातून होणारी अवैध रेती तस्करी बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे.


0 टिप्पण्या