• ३७९ मतदान केंद्राची निर्मिती
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुदत संपणाऱ्या विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षाचे ३, राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षाचे ४ व अपक्ष ६ असे एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सोमवारी(ता.१८) रोजी सायंकाळी ५:०० वाजता पासून प्रचार तोफा थंडावल्या असून बुधवार २० नोव्हेंबर रोजी या सर्व उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. ६२ साकोली विधानसभा क्षेत्रातील ३ तालुक्यातून १७९ मतदान केंद्रावरून ३ लाख २४ हजार ७९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या विधानसभा निवडणुकीवर निर्वाचन आयोगाची पैनी नजर असून गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत होती. तसतसे तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्यांनी विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले होते. राजकीय पक्षांनी काहींना अधिकृत उमेदवारी दिली. तर काहींनी बंडखोरीचे शस्त्र उगारून अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षालाच आव्हान दिले. काहींची नाराजी दूर करण्यात नेते मंडळी यशस्वी झाले असून तेही उमेदवारासोबत मतांचा जोगवा मागण्यासाठी गावोगावी भ्रमंती करीत आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात लाखनी, साकोली व लाखांदूर हे ३ तालुके समाविष्ट असून एकूण मतदार संख्या ३ लाख २४ हजार ७९४ आहे. त्यात १ लाख ६२ हजार ७३८ पुरुष तर १ लाख ६२ हजार ५६ महिला मतदार आहे. तालुकानिहाय मतदार संख्येचा विचार केल्यास लाखनी एकूण १ लाख १० हजार ६८२ मतदार आहेत. त्यापैकी ५५ हजार १२ पुरुष तर ५५ हजार ६७० महिला. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. लाखांदूर तालुक्यात एकूण मतदार ९९ हजार ७२३ असून ५० हजार १४४ पुरुष तर ४० हजार ५७९ महिला मतदार आहेत. साकोली तालुक्यात १ लाख १४ हजार ३८९ एकूण मतदार असून त्यात ५७ हजार ५८२ पुरुष व ५६ हजार ८०७ महिलांचा समावेश आहे.
मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे. या करिता ३७९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून मतदार या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या आधी झालेल्या निवडणुकात ७२ टक्के उच्चांकी मतदानाची २०१९ मध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यात ३ लाख १४ हजार ६८३ मतदारांपैकी २ लाख २६ हजार ६८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मागील विधानसभा निवडणुकीत ७१.१६ टक्के तर लोकसभा निवडणुकीत ७१.३२ टक्के मतदान झाले होते. सोमवारी प्रचारतोफा थंडावल्या असून आज बुधवारी(ता.२० नोव्हेंबर) मतदान होणार आहे. त्यात १ लाख ६२ हजार ७३८ पुरुष व १ लाख ६२ हजार ५६ महिला एकूण ३ लाख २४ हजार ७९४ मतदार मतदानाचा हक्क बजावून आमदार कोण होणार. हे सुनिश्चित करणार आहेत.


0 टिप्पण्या