• गावकऱ्यांत भीतीचे वातावरण
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- शेळ्या चारण्यासाठी मांगली/बांध येथील पटाच्या दानीवर नेले असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून एक शेळी फस्त केली. त्या शेळीचे अवयव सोमवार(ता. १८ नोव्हेंबर) सकाळी ९:०० वाजता दरम्यान मिळून आल्याने ही घटना उघडकीस आली. वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून नुकसानग्रस्त शेळी मालकाचे नाव होमराज रामभाऊ पुस्तोडे, रा. मांगली/बांध असे आहे. या घटनेमुळे मांगली/बांध आणि परिसरातील पशुपालक व गावकऱ्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांगली परिसरातच या आधीही वाघाच्या हल्ल्यात १ शेळी व गाय ठार झाली. तर १ शेळी जखमी झाली आहे. वन विभागाने या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
धान शेती परवडेनासी झाल्यामुळे धान उत्पादक शेतकरी पशू पालनाकडे वळला आहे. काही शेतकऱ्यांनी शेळ्या तर काहींनी गायी, म्हशी पाळणे सुरू केले आहे. मांगली/बांध येथील अनेक शेतकऱ्यांकडे पशुधन असून चराईसाठी वनक्षेत्रालगत पटाचे दानीवर नेतात. रविवारीही गावातील शेळ्या चराईसाठी पतचे दानीवर नेण्यात आल्या होत्या. सायंकाळचे सुमारास पट्टेदार वाघाने हेमराज पुस्तोडे यांचे मालकीची शेळी फस्त केली. पण कोणत्याही गुराख्याचे निदर्शनास आली नाही. सोमवारी सकाळी गावकरी तथा वन कर्मचाऱ्यांनी परिसर पाहणी केली असता शेळीचे वाघलेल्या अवस्थेत तोंड, पाय व त्या जागेवर रक्त तसेच वाघाची विष्ठा दिसून आल्याने पट्टेदार वाघानेच शेळी फस्त केल्याचा वन कर्मचाऱ्यांनी अंदाज वर्तविला. तसेच पंचनामा करून घटनेची किटाडी चे पशुधन विकास अधिकारी यांना देण्यात आली. नुकसानग्रस्त पशुपालक होमराज पुस्तोडे यांचा १५ हजार रुपयाचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. १० दिवसातील ही चौथी घटना असून वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पशू पालकांसह गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.


0 टिप्पण्या