• सेलोटी येथील घटना
• अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- धानाची कापणी करून मळणीसाठी शेतशिवारात ठेवलेला पुजना कोणीतरी अज्ञात इसमाने जाळल्याची घटना रविवार(ता.२४ नोव्हेंबर) रोजी सकाळी ६:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव देवराम आसाराम लाडे, रा. सेलोटी, तालुका लाखनी असे असून त्यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे धान उत्पादकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवराम लाडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचेकडे १ हेक्टर शेतजमीन आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये त्यांनी धानाची लागवड केली होती. १० दिवसापूर्वी धानाची कापणी करून मळणीसाठी शेतशिवारात धानाचा पुजना रचून ठेवलेले होता. ते शनिवारी सायंकाळी ६:०० वाजता दरम्यान शेतावर गेले असता धानाचे पूजने व्यवस्थित होते. रविवारी सकाळी ६:०० वाजता दरम्यान सदर धान उत्पादक घरी हजर असताना शेताजवळील शेतकरी नितीन कांबळे याने भ्रमणध्वनीवरून तुमचा धानाचा पुजना जळत आहे. अशी माहिती दिली. मी शेतात गेलो असता पूजना जळतांना दिसल्याने शेतातील विहिरीतील पाण्याच्या साहाय्याने विझविलो. पण पूजना जाळून अंदाजे ५० हजाराचे नुकसान झाले आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने माझा शेतातील धानाचा पूजना जाळल्याने त्याचेवर कारवाई करण्यात यावी. या करिता पोलिस ठाणे गाठून फिर्यादी दाखल केली. नुकसानग्रस्त शेतकरी देवराम लाडे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अज्ञात इसमावर अपराध क्रमांक ४९७/२०२४ कलम ३२६(एफ) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून लाखनी पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्त लिहीपर्यंत धानाचा पूजना कोणी जाळला याचा शोध लागला नव्हता.


0 टिप्पण्या