Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरमध्ये आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीला हादरा – दोन जण अटकेत, ३ लाखांची रोकड जप्त

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-पंढरपूर शहरातील बँकांच्या बाहेर सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. पंढरपूर शहरातील एचडीएफसी बँकेच्या बाहेरून चोरी झालेल्या पैशाच्या बॅग प्रकरणी आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर शहरातील सरगम चौक येथील एचडीएफसी बँकेच्या बाहेर एका व्यक्तीची पैशांनी भरलेली बॅग चोरीला गेली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासादरम्यान, हे कृत्य आंध्र प्रदेशातील बॅग लिफ्टिंग टोळीने केल्याचा ठोस पुरावा मिळाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांना गुप्त माहिती मिळाली की, या टोळीतील काही सदस्य आंध्र प्रदेशातून सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि दोन जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे योहान प्रसाद गुड्डेट्टी (वय ४६) आणि रवि नागराज नायडू (वय ४९) असून, दोघेही कपारलाटिप्पा, पोस्ट बिटरगुंटा, ता. कावली, जि. वेल्लोर, आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत. या दोघांकडून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या मोटारसायकली, तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर चोरीला गेलेल्या पैशांपैकी ३ लाख रुपये रोख पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या टोळीतील इतर सदस्य देखील महाराष्ट्रात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करून उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. बँकेतून मोठ्या प्रमाणात रोकड काढल्यानंतर सतर्क राहण्यासह, संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या