Ticker

6/recent/ticker-posts

बार्शी शहरात घरफोडीची घटना : २६,५०० रुपयांच्या दागिन्यांची व रोख रकमेची चोरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापुर : बार्शी शहरातील राऊत चाळ परिसरात दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका कुटुंबाच्या घरात घुसून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २६,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २६ मे २०२५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते ८ जून २०२५ रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत आप्पासाहेब रामा माने (वय ५८, व्यवसाय – किराणा दुकानदार, रा. राऊत चाळ, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पत्नी चित्रा आणि आई वेणुबाई यांच्याकडे जुने पारंपरिक दागिने होते, जे त्या सण-समारंभाच्या वेळी वापरत असत व कार्यक्रमानंतर घरातील कपाटात ठेवत असत.

२६ मे रोजी नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघी महिला रिंग रोड सुभाषनगर येथे गेल्या असताना घरी कोणीच नव्हते. लग्नावरून परत आल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे दागिने कपाटातील डब्यात ठेवले. मात्र, आज दि. ८ जून रोजी पुन्हा दुसऱ्या लग्नकार्याला जाण्यापूर्वी दागिने काढण्यासाठी कपाट उघडले असता, दागिने आणि ८,००० रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादीने नमूद केल्याप्रमाणे चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये खालील ऐवजांचा समावेश आहे:

१४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व डोरले असलेले दोन गंठण – अंदाजे किंमत ₹८,०००
७ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ – ₹४,०००
७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे – ₹४,०००
३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल फुले – ₹२,०००
एक जोड चांदीचे जोडवे – ₹५००
१६ नोटा ₹५०० दराच्या, एकूण रोख रक्कम – ₹८,०००
एकूण चोरीस गेलेल्या मालमत्तेची किंमत ₹२६,५०० इतकी आहे.

फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात सांगितले की, दागिने आणि रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी घरातील सर्व सदस्यांकडे चौकशी केली, मात्र कोणालाही त्याबाबत काही माहिती नव्हती. यामुळे घरी कोणीही नसताना दरवाजा उघडा असल्याने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील डब्यातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा ठाम संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत. घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या