Ticker

6/recent/ticker-posts

"भाजप कार्यकर्ता असेल तरच ठेका – हे अन्यायकारक धोरण"; खासदार ओमराजे निंबाळकर यांचा खडक शब्दात भाजपा सरकारवर हल्लाबोल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
धाराशिव :"भाजपचा कार्यकर्ता असेल तरच ठेका, निधी; बाकीच्या जनतेनं कुठं जायचं?" असा सवाल उपस्थित करत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकप्रतिनिधींची जबाबदारी संविधानाच्या चौकटीत राहून प्रत्येक नागरिकाशी न्याय करणं असतानाही, सत्ता ही पक्षाच्या कार्यकर्त्यांपुरती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपाच्या 'राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय, व्यक्ती तृतीय' या घोषणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "लोक मेले तरी चालतील, पण कार्यकर्त्यांना ठेके मिळाले पाहिजेत, निधी गेला पाहिजे, ही वृत्ती लोकशाहीच्या विरोधात आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

"मी एका पक्षाकडून निवडणूक लढवली खरी, पण निवडून आल्यानंतर मी ईश्वराला साक्ष ठेवून संविधानाच्या तरतुदींप्रमाणे शपथ घेतो. सर्व जनतेशी समानतेने वागण्याची ती शपथ असते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर भाजपचे मंत्री ज्या प्रकारची वागणूक देतात, ती संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे," असेही ते म्हणाले.

खासदार ओमराजेंनी सूचित केले की, "ही कृती दुर्दैवी असून, जनता याचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या अन्यायकारक वागणुकीचा बदला मतपेटीतून घेतला जाईल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या