चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : वंचित बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूरच्यावतीने महानगर अध्यक्षा तनुजा रायपूरे यांच्या नेतृत्वाखाली विविध जनहिताच्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. अनेकवेळा आंदोलन करूनही प्रश्न सुटले नाहीत, त्यामुळे आज उपायुक्त मंगेश खवले यांना जुन्या आणि महत्वाच्या निवेदनांच्या प्रती पुन्हा सादर करण्यात आल्या.
या निवेदनांमध्ये महिलांसाठी सुलभ सार्वजनिक शौचालये, CBSC शाळा सुरू करणे, प्रभागातील स्वच्छता, नाली व गटारांचे काम अशा मूलभूत गरजांचा समावेश आहे. प्रशासनाने वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कामांची अंमलबजावणी होत नसल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे.
विशेषतः कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या महिला कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले. या महिलांना मागील चार महिन्यांपासून पगारही मिळालेला नाही. त्यांना पुन्हा कामावर घेऊन थकीत वेतन त्वरित द्यावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदन प्रसंगी तनुजा रायपूरे आणि मोनाली पाटील प्रमुख उपस्थित होत्या. वंचित बहुजन महिला आघाडीने स्पष्ट इशारा दिला की, "महिलांवर अन्याय झाल्यास ते कदापी खपवून घेतले जाणार नाही."
महिला आघाडीने प्रशासनाला दिलेला हा इशारा येत्या काळात कोणत्या कृतीतून उतरते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या