Ticker

6/recent/ticker-posts

परभणी जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिल्या शुभेच्छा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी : शिवराज्याभिषेक दिन जिल्हा परिषदेमध्ये आज उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी ध्वनी संदेशाद्वारे शिवराज्याभिषेक दिनाच्या जनतेला  शुभेच्छा दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहित आणि राष्ट्रहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन देखील केले.   

तर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची उभारणी केली. जातपात न मानता बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी अनेक लढाया जिंकल्या, किल्यांची उभारणी केली, महिलांना सन्मान मिळवून दिला. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले, असे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील पोलास, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) दिनकर घुगे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) डी एस उडाणशिवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने, प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी ऋतुजा सुपेकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी देखील करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज कन्नावार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या