Ticker

6/recent/ticker-posts

अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार

१०५० कोटी रूपयांची गुंतवणूक ; २ हजाराहून अधिक रोजगाराची संधी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शिर्डी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला 'पंप स्टोरेज हब' बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या सामंजस्य करारांतर्गत अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा 'सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प' (Pumped Storage Project) उभारण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या प्रकल्पासाठी 'न्यु एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. अकोले तालुक्यात सुमारे १०५० कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून होणार असून, यामुळे स्थानिकांसाठी २ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यात २३,८०० कोटींची गुंतवणूक :  राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये अकोले येथील प्रकल्पासह पश्चिम घाट (५,२०० मेगावॅट) व कोयना टप्पा-६ (४०० मेगावॅट) या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या करारांतून राज्यात सुमारे २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, ११,५०० नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या सर्व प्रकल्पांमुळे राज्याची वीजनिर्मिती क्षमतेत ५८०० मेगावॅटची भर पडणार आहे, असेही श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या