Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम मुंडीपार येथे शिवमहापुराण कथेचे भक्तिभावात भव्य उद्घाटन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोरेगाव :तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने व भगवान महादेवांच्या कृपेने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण कथेचे भक्तीमय वातावरणात भव्य उद्घाटन संपन्न झाले. सदर सात दिवसीय धार्मिक कार्यक्रम दिनांक ३० जानेवारी २०२६ ते ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुप्रसिद्ध कथावाचिका सौ. दुर्गाश्री माई ब्रह्मानंद गिरी यांच्या मधुर व ओघवत्या वाणीतून सादर होत आहे.
या पावन कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदिया डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक, गोंदियाचे माननीय संचालक श्री दुर्गाप्रसाद ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदिया अर्थ व बांधकाम समितीचे सभापती माननीय डॉ. लक्ष्मणजी भगत हे होते. दीपप्रज्वलक म्हणून माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगाव श्री. सुरेंद्र बिसेन यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
यावेळी सहउद्घाटक म्हणून माऊली फाउंडेशन, गोंदियाचे श्री. आनंद चंद्रिकापुरे, ग्रामपंचायत मुंडीपारच्या सरपंच माननीय सौ. प्रेमलताताई राऊत तसेच ग्रामपंचायत पिंडकेपारच्या सरपंच माननीय सौ. योगिताताई शहारे ,ग्राम पंचायत सदस्या सरिता सुरजोसे,ग्राम पंचायत सदस्या आम्रपाली राऊत व मान्यवर गावकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात पार पडताच संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगाव श्री. सुरेंद्र बिसेन यांनी शिवमहापुराण कथेचे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व सविस्तरपणे विशद केले. शिवमहापुराणामधून भगवान शंकरांचे तत्वज्ञान, भक्ती, वैराग्य, संयम व मानवतेचा उदात्त संदेश मिळतो. अशा पवित्र कथेचे सातत्याने श्रवण केल्यास मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कथावाचिका सौ. दुर्गाश्री माई ब्रह्मानंद गिरी यांच्या मधुर वाणीतून साकार होणारी ही शिवमहापुराण कथा भाविकांना अध्यात्मिक आनंद व आत्मिक समाधान देणारी ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कथेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून भक्तीमय वातावरण अनुभवत आहेत.
तरी श्री शिवमहापुराण कथेचे सातही दिवस नियमित श्रवण करण्यासाठी परिसरातील व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या