नाशिक विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन संपन्न
चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे : सामाजिक न्याय व विशेष साहाय विभागातर्फे आयोजित स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंनी उत्साहाने, खिलाडूवृत्तीने खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नाशिक महसूली विभागातील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, नाशिक माधव वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, महिला व बाल विकास विभागाचे परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, विशेष अधिकारी (शानिशा) राजेंद्र कांबळे, श्रीमती सविता लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, तुम्ही येथे केवळ स्पर्धेसाठी नव्हे, तर मनोरंजनासाठी एकत्र आले आहात. सर्व खेळाडूंनी उत्साहाने, खिलाडूवृत्तीने आणि आनंदाने खेळाचा आनंद घ्यावा. आयोजकांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. विजय किंवा पराभव कोणताही असो, परस्पर मैत्री, सलोखा आणि खेळभावना कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक स्वाती काकडे म्हणाल्या की, विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याच उत्साहाने पुढील आयुष्यातही विविध स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा.
प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ म्हणाले की, सामाजिक न्याय विभागांतर्गत नाशिक विभागातील विविध शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धा ऐतिहासिक ठरतील आणि या स्पर्धा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरतील.
सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी सांगितले की, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर येथील एकूण 10 शाळांनी या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.
प्रारंभी मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पथसंचलन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेशचंद्र दराडे यांनी केले, तर मनोजकुमार देवरे यांनी आभार मानले.


0 टिप्पण्या