Ticker

6/recent/ticker-posts

बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी

 
 ४८ तासांत बेपत्ता अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ४८ तासांच्या आत बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध घेण्यात यश आले असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 बार्शी शहरातील टिळक चौक परिसरात राहणारे दशरथ शहाजी चव्हाण यांचा मुलगा श्रेयश दशरथ चव्हाण (वय १३ वर्षे) हा दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी कोणासही न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. ०३/२०२६ भा.न.सं. कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांनी तात्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. झालटे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला शोधकार्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने बार्शी बस स्थानक, कुडुवाडी बस स्थानक तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथील सी.सी.टी.व्ही. फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासात मुलगा पुणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पथकाने पुणे येथे तात्काळ शोधमोहीम राबवून दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी श्रेयश चव्हाण यास सुखरूप शोधून काढले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर अल्पवयीन मुलास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रियत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक सायकर व पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सपोंनि श्री. झालटे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पोहेका/०९ ठोंगे, पोहेकॉ/१६५१ केकाण, पोकों/ राहुल उदार, पोकों/ सतिश उघडे, पोकों/ बाळकृष्ण मुठाळ व पोकों/ वैभव भांगे यांनी मोलाची भूमिका बजावली.

 बार्शी शहर पोलिसांच्या या तत्पर व कार्यक्षम कामगिरीमुळे अल्पवयीन मुलगा सुखरूप कुटुंबियांच्या भेटीस आला असून, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या