Ticker

6/recent/ticker-posts

एका ताऱ्याची झेप : गावातून सात समुद्रापार एका वैज्ञानिकाचा प्रवास – डॉ. तारेंद्र लाखनकर

भंडारा :-अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे वरिष्ठ वैज्ञानिक, संशोधक व प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. तारेंद्र लाखनकर तुमसर येथे वास्तव्यास असताना त्यांनीं आपल्या पितृगाव मुंडीकोटा येथे भेट दिली. ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले त्या मुंडीकोटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुभाष विद्यालयाला त्यांनी भेट दिली व मुलांना मोटीवेट व मोलांचे मार्गदर्शन केले . बालपणी शिक्षण देणारे शिक्षक-शिक्षिका तसेच जुने जिवलग मित्र यांच्यासोबत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,कठोर परिश्रम व दृढ संकल्प यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. कधीही हार मानू नका, सातत्याने पुढे जात राहा. जिथे इच्छाशक्ती असते तिथे कार्य नक्कीच यशस्वी होते.अशा मार्गदर्शनातून त्यांनी आपल्या गावात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले व विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रेरणा दिली.
एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज, शहापूर येथील प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांच्या मुंडीकोटा येथील निवासस्थानी डॉ. लाखनकर यांचे बालपणीचे शिक्षक-शिक्षिका गुरु वच्छलाताई मेश्राम, चींदूताई कुकडे मॅडम, यशवंत लाखनकर, कमलाकर महाकाळकर गुरुजी, रमेश रेवतकर गुरुजी तसेच मित्र सईद शेख,माजी जि.प. सदस्य मनोज डोंगरे, शिरीन नेत्रावाला शाळेचे शिक्षक फारुख शेख, विनय भांडारकर, हिदायत तुरक आदींसोबत त्यांनी जुन्या आठवणी शेअर केल्या.

मुंडीकोटा ग्रामपंचायत सचिवालयाच्या सभागृहात सरपंच सौ. प्रतिमा जैतवार व उपसरपंच श्री. देवेंद्र मंडपे यांच्या हस्ते डॉ. लाखनकर यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव व सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत आलेले ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष शेख, एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज (शहापूर) चे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे सर, यशवंत लाखनकर, माजी मुख्याध्यापिका वच्छलाताई मेश्राम, चींदूताई कुकडे यांचाही शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.शेख व डॉ. हरडे यांनी डॉ. लाखनकर यांच्या मुंडीकोटातून अमेरिकेपर्यंतच्या प्रवासावर विशेष प्रकाश टाकला.
         रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या आई-वडिलांची चहा-पानाची टपरी होती. बालपणी तारेंद्र व त्यांचे भाऊ ट्रेनमधून उतरणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच शेजारील मनोहरभाई बीडी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी चहा बनवत असत. त्यानंतर ते तुमसरला गेले. तेथे आपल्या आई _वडिलां सोबत  आटा_चक्की चालवून कसे_बसे शिक्षण पूर्ण करीत जीवन जगू लागले. तुमसर येथील राष्ट्रीय विद्यालय व एस.एन. मोर कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे नागपूरच्या व्हीएनआयटी कॉलेजमध्ये, त्यानंतर नांदेड व मुंबई येथे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी अमेरिकेची झेप घेतली.
भारतासह सुमारे ४० पेक्षा अधिक देशांना त्यांनी भेटी दिल्या असून तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रेरणा व मार्गदर्शन दिले आहे. हवामान बदल, अंतरिक्ष, हिमालय पर्वतरांग, विज्ञान, नासा ई .विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प व संशोधन कार्य केले आहे. “एका ताऱ्याची झेप – गावातून सात समुद्रापार एका वैज्ञानिकाचा प्रवास” या नावाचे त्यांच्यावर पुस्तकही लिहिले गेले असून ही पुस्तक त्यांच्या जीवनातील संघर्ष, कष्ट आणि यशाची कहाणी सांगणारी आहे,  त्याचे इंग्रजी संस्करण वाचून परदेशी मुलेही प्रभावित होत आहेत.

त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन न्यूयॉर्क (अमेरिका) येथील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्ककडून त्यांना “प्रेसिडेंट अवॉर्ड” तसेच इतर अनेक पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. त्यांचे दोन भाऊही परदेशात वास्तव्यास आहेत. सध्या ते अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे सेंटर फॉर अर्थ सिस्टिम सायन्स अँड रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीज (नोव्हा) येथे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या गावची माती त्यांना नेहमीच साद घालते. त्यामुळे ते दरवर्षी गावाला भेट देऊन आपल्या शिक्षक व मित्रांशी आवर्जून भेटतात. भारतातील इतर ठिकाणांनाही ते भेट देतात व विद्यार्थ्यांना प्रेरणा व योग्य मार्गदर्शन करतात, त्यांच्यासोबत अविस्मरणीय क्षण घालवतात!
                   मो सईद शेख,भंडारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या