चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-फाल्गुन पौर्णिमेनिमित्त त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदर ता. साकोली जि. भंडारा येथील बौद्ध धम्म परिषदेत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उपासक रामचंद्र मेश्राम होते. यावेळी " बौद्ध धम्म, भारताचे संविधान, तथागत बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य " या विषयावर संपन्न झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्व वयोगटातील एकूण २६ मुले, मुली व स्त्री, पुरुषांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना क्रमाक्रमाने बौद्ध धम्म, भारताचे संविधान, तथागत बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आधारित ८० प्रश्न प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी विचारले. प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या स्पर्धकांना गुण देण्यात आले. यापैकी ज्या स्पर्धकांनी अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे दिली. अशा तीन स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये मुला- मुलींच्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक धम्मदीक्षा मेश्राम यांना प्रा. डॉ. शंकर बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर स्त्रियांच्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुचिता गोस्वामी यांना प्रा. ज्योती कानेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच पुरुषांच्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नितेश देशभ्रतार यांना मा. रामचंद्र मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील तीनही विजेत्यांना १६०० रूपये रोख आणि १४०० रूपयाचे ग्रंथ असे एकूण ३००० रूपयांची पारितोषिके प्रा. डॉ. शंकर बागडे यांच्याकडून देण्यात आली.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. शंकर बागडे यांनी केले तर गुणदानाचे कार्य व आभारप्रदर्शन प्रा. ज्योती कानेकर यांनी केले. याप्रसंगी साकोली परिसरातील तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील स्त्री पुरुषांची आणि मुला मुलींची बहुसंख्येनी उपस्थिती होती.प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भदन्त प्रज्ञाज्योती भिक्खू बहुउद्देशीय संस्था आलेबेदर /तुडमापुरी यांनी आणि दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद आयोजक समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.


0 टिप्पण्या