चित्रा न्युज प्रतिनिधी
वरोरा : होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो प्रेम, आपुलकी आणि नात्यांची जपणूक करणारा सण आहे. याच भावनेतून आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि युथ सोशल ग्राम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम येथे होळी निमित्त विशेष रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधत त्यांच्या आयुष्यातील अनुभव ऐकले. या उपक्रमात रुपेश कुत्तरमारे, संकेत बोथले, राकेश क्षीरसागर, सूर्यकांत जांभुळे, श्रवण श्रीरामे, क्षितिज केराम, शुभम वाकडे, शितल भुते, उज्वला शेरकुरे, राणी देऊरकर प्रांजली नन्नावरे, प्रांजली उईके, साक्षी घरत, श्रेया गुप्ता, पौर्णिमा हनवते आणि सायली बलकी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी वृद्धांना फळे, मिठाई व आवश्यक वस्तूंचे वाटप केले तसेच गुलाल लावून त्यांचा आशीर्वाद घेतला. पारंपरिक होळी गीतांनी व आनंददायी वातावरणामुळे संपूर्ण वृद्धाश्रम परिसरात उत्साहाचे रंग भरले.
कार्यक्रमादरम्यान एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग घडला. एका आजींनी आपल्या आयुष्याची वेदनादायी कहाणी सांगताना नमूद केले की, “माझा मुलगा स्वभावाने चांगला आहे; मात्र पत्नीच्या दबावाखाली येऊन त्याने मला घराबाहेर काढले.” त्यांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू पाहून उपस्थित सर्व विद्यार्थी भावुक झाले. या घटनेने आजच्या युवकांना विचार करायला भाग पाडले की, आधुनिकतेच्या प्रवाहात आपण आपल्या संस्कारांना आणि कुटुंबमूल्यांना विसरत तर नाही ना?
हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश राठोड, कार्यक्रमाधिकारी डॉ. धनश्री पाचभाई आणि कार्यक्रमाधिकारी नीरज आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत सांगितले की, “आजची युवा पिढी जर संवेदनशील राहिली, तर समाजात माणुसकी जिवंत राहील.”
या उपक्रमातून आजच्या युवकांना एक ठोस संदेश देण्यात आला की, आई-वडिलांचा सन्मान व सेवा करणे हीच खरी संस्कृती आहे. वृद्धांचे अनुभव हे जीवनाचे अमूल्य धडे असून त्यांचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्र येऊन आनंददायी वातावरणात होळी साजरी करण्यात आली.


0 टिप्पण्या