चित्रा न्युज प्रतिनिधी
संगमनेर :-संगमनेर तालुक्यातील वडगाव पान व मनोली गावांच्या शिवाराच्या सीमेवर आश्रम उभारून स्वतःला “दत्तधाम सरकार” उर्फ गडगेबाबा म्हणवणारा एक भोंदू व्यक्ती लोकांची फसवणूक करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्रभरातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
हा भोंदू बाबा “कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करतो”, “अपत्यहीन महिलांना अपत्य प्राप्त करून देतो” अशा खोट्या व भ्रामक दाव्यांद्वारे लोकांना आकर्षित करत असून, हे सर्व आपल्या दैवी शक्ती व मंत्रसामर्थ्याने शक्य असल्याचे सांगत आहे. यासाठी त्याने “दत्तधाम सरकार” नावाचे युट्युब चॅनलही सुरू करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातबाजी सुरू ठेवली आहे.
या प्रकरणी तक्रारीच्या आधारे ३० मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी विभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला. तसेच १३ एप्रिल रोजी पंचायत समिती संगमनेरच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे संबंधित बाबाकडून दिल्या जाणाऱ्या औषधांचा साठा, परवाने व इतर बाबींची चौकशी करून पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, १२ एप्रिल रोजी संबंधित भोंदू बाबाने काही व्यक्तींच्या माध्यमातून तक्रारदाराला फोन करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या सुमारास काही व्यक्ती थेट घरी येऊन चर्चा करण्याचा आग्रह धरत त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या भोंदू बाबाने काही भक्तांच्या मदतीने एक बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीस खंडणी मागत असल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ॲड. रंजना पगार गवांदे यांचे छायाचित्र वापरून त्यांची वैयक्तिक बदनामी करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकाराविरोधात ॲड. रंजना पगार गवांदे यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. संबंधित व्हिडिओ पुराव्यासाठी पेन ड्राईव्हमध्ये पोलीस प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध करत स्पष्ट केले आहे की, व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींचा समितीशी कोणताही संबंध नाही. तसेच अशा बदनामीकारक व्हिडिओंचे प्रसारण कोणीही करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या