Ticker

6/recent/ticker-posts

पेट्रोल पंप NOC साठी लाचखोरीचा पर्दाफाश; ACB चा सापळा यशस्वी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
कल्याण  :-पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेल्या नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी लाच मागणाऱ्या वन विभागातील दोन अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार विरोधी पथकाने (ACB) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे वन विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी वन विभागाकडे NOC साठी अर्ज केला होता. संबंधित प्रकरणाची पडताळणी व घटनास्थळाची पाहणी करण्याची जबाबदारी वनपाल विलास शिवाजी सानप (वय ५१) यांच्याकडे देण्यात आली होती.
दरम्यान, सानप यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट ACB ठाणे कार्यालयात तक्रार दाखल केली. ACB पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपींनी रकमेवर तडजोड करत २५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर ACB ने सापळा रचला. दि. १५ एप्रिल २०२६ रोजी, सानप यांच्या सूचनेनुसार वनसंरक्षक रेखा विनायक गायकवाड (वय ३८) यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर सानप यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाची नोंद टिटवाळा पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी क्रमांक ४१, वेळ २०:०९ वा. रोजी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या