चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय प्राथमिक शाळा परिसरात पार पडलेल्या या शिबिरात विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य सुमिला पटले होते. उपजिल्हाधिकारी महादेव जोरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार शितल घावटे, उपसभापती सुनील बांते, नायब तहसीलदार शरद हलमारे, पंचायत समिती सदस्य किशोर मडावी, सरपंच श्याम शिवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिरात महसूल विभागामार्फत उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रांसह विविध सेवा देण्यात आल्या. एकूण ८३ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ५६ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
तसेच आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार शीतल घावटे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी रितेश देशमुख यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत व संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या