Ticker

6/recent/ticker-posts

साकोली तालुक्यात वन्य आणि मानवी जीव संघर्ष शिगेला पोहचला

भंडारा जिल्ह्यात साकोली तालुका हॉट 

वाघिणीचा लपंडाव तर व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघ बेपत्ता 

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- एप्रिल महिना अर्ध्यावर आला आहे. अर्धा एप्रिल आणि पूर्ण मे महिना अद्याप बाकी आहे. तापमान वाढतीवर आहेच परंतु भंडारा जिल्ह्यात सध्या तरी साकोली तालुका सर्वाधिक हॉट ठरलेला आहे. वनविभाग आणि वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांची सध्या तरी झोप उडाली असून वन्यजीव आणि मानवी जीव यांच्या संघर्षामुळे वन विभागाला चांगलाच घाम फुटलेला आहे. संतापलेल्या ग्रामीण भागातील जनतेचा आणि आकाशातील तापलेल्या सूर्याचा तडाखा अशा दोन्ही बाजूचा सामना संबंधित विभागाला करावा लागत आहे. चौथ्या घटनेनंतर एखादी पाचवी घटना घडली तर मात्र वन विभागाला नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे हे निश्चित. अशी भयावह परिस्थिती सध्या तरी साकोली तालुक्यात निर्माण झालेली आहे. यामुळे वनविभागचे कर्मचारी,अधिकारी स्वतःच दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे सध्या तरी साकोली तालुका भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक हॉट ठरलेला आहे. अशातच बांपेवाडा, उमरझरी, आमगाव ( बु. ) निप्पलटोला या परिसरात वाघिणीचा लपंडाव, वीरसी परिसरात  बिबट्याचा शिरकाव आणि व्याघ्र प्रकल्पातील बेपत्ता असलेले दोन वाघ या कारनाम्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प विभाग आता रडारवर आलेला आहे. अश्यातच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तिघे मृत्युमुखी झाल्यामुळे हा विभाग सध्या तरी कोमात गेलेला आहे.
----------------------------------------------
      प्रकल्पातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ?

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील ( एनएनटीआर ) पांगडी नावाचा प्रबळ नर वाघ आणि एक वाघीण गेल्या ६ महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. या संकटामुळे वन्यजीव अभ्यासकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रकल्पातील वाघांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पांगडी हा वाघ गेल्या डिसेंबर पासून कुठेही दिसून आलेला नाही. त्याच्या वेपत्ता होण्यानंतर त्याचा क्षेत्रात जांभडी नावाच्या एका नवीन प्रबळ नरांची नोंद झाली होती. विशेष म्हणजे पांगडी आणि जांभडी यांच्यात कोणत्याही प्रकारच्या लढाईचे किंवा संघर्षाचे पुरावे वनविभागाला मिळालेले नाहीत. सामान्यतः एखादा वाघ आपला प्रदेश तेव्हा सोडतो जेव्हा दुसऱ्या बलवान नराशी झालेल्या संघर्षात त्याचा पराभव होतो. अशा परिस्थितीत कोणत्याही संघर्षाशिवाय एका प्रबळ नराचे अचानक गायब होणे संशयास्पद मानले जात आहे. वाघांच्या जगात जेव्हा एखादा प्रबळ नर नाहीसा होतो तेव्हा नवीन नर त्या अधिवासावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो.आपले स्वतःचे वंश वाढविण्यासाठी नवीन नर अनेकदा जुन्या नराच्या पिल्लांना ठार मारतो. पांगडी नराची पाच वाघिणींशी झालेली विन पाहता या पिल्लांच्या जीवाला आता मोठा धोका निर्माण झाला असल्याचे संकेत आहेत. वाघांची संख्या आणि अनुवांशिक  विविधता वाढविण्यासाठी प्रकल्पात आणलेली एनटी- ३ ही वाघीण देखील गेल्या ६ महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या वाघिणीच्या हालचाली बाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने संवर्धनाच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
-----------------------------------------------
            वाघिणीचा लपंडाव अद्याप सुरूच 

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पिटेझरी वन परिक्षेत्रात सध्या मानवी जीव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाने टोक गाठलेले आहे. १९ मार्च २०२० ला वसंत मेश्राम यांच्यावरील पहिल्या हल्ल्यापासून सुरू झालेली ही दहशत २८ दिवस पालटले तरी कायम आहे. जखमी टी-२७ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे सुमारे २०० कर्मचारी, ४ शार्प शूटर आणि आधुनिक तंत्रज्ञान युद्धपाळीवर कार्यरत आहे. मात्र सध्या तरी वाघीण आणि वनविभागाच्या मध्ये होतो " हुतुतू " चा खेळ सुरू असून वाघीण अद्यापही वन विभागाच्या टप्प्यात आलेली नाही.  या वाघिणीने आतापर्यंत ३ भीषण हल्ले केलेले आहेत ज्यात दोघांचा मृत्यू झालेला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात प्रशासकीय सुत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने " एक संघनियंत्रण " प्रणाली लागू केली आहे. सध्या वाघिणीचे सनियंत्रण करण्यासाठी ५० हुन अधिक कॅमेरा ट्रॅप आणि १० लाईव्ह कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. रात्रीच्या वेळी शोध घेण्यासाठी ४ थर्मल ड्रोनची मदत घेतली जात असून पिटेझरीच्या कक्ष क्रमांक १४३ मध्ये वाघिणीला आकर्षित करण्यासाठी अमिष ( बेट ) आणि मचानही तयार करण्यात आलेले आहे.
-----------------------------------------------                                  

     वाघिणीच्या बंदोबस्तासाठी उद्रेक होण्याची शक्यता ?
 
तालुक्यात बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रशासनाच्या संथ कारभारा विरोधात २९ मार्च २०२६ रोजी ग्रामस्थांनी साकोली-तिरोडा मार्ग रोखून धरलेला होता. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रवेशद्वार असलेल्या शिवणटोला आणि पिटेझरी भागात नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली होती. जखमी माया सोनवणे यांना वेळेत मदत आणि उपचार न मिळाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी परिसरात जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली होती. नागरिकांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली होती. जोपर्यंत पीडित महिलेला तातडीने आर्थिक मदत मिळत नाही आणि नरभक्षक वाघिणीचा कायम स्वरूप असते बंदोबस्त होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलेला होता. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी आंदोलनाचे पुढारीपण केलेले होते. वाघिणीचा लपंडाव आणि बिबट्याचा शिरकाव हा खेळ जर लवकर थांबला नाही तर परिसरात मोठा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या