Ticker

6/recent/ticker-posts

मंजुषा चित्रीवेकर यांचा साहित्य क्षेत्रात लौकिक

तेरे लिये  कवितांचे पुस्तक प्रकाशित

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- तालुक्यातील सेंदुरवाफा या छोट्याशा गावची लेक सौ. मंजुषा लोकेश चित्रीवेकर यांनी आपल्या कर्तृत्वाने गाव, तालुका आणि जिल्ह्याचा नावलौकिक राज्यपातळीवर पोहोचवला आहे. साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत शिक्षण, साहित्य व सौंदर्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सध्या त्या कल्याण येथे वास्तव्यास असूनही आपल्या मुळाशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिलेली नाही. मंजुषा ह्या एक बहुआयामी, प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्या पेशाने शिक्षिका असून त्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर संस्कार, आत्मविश्वास आणि जीवनमूल्यांचे धडे देण्याचे कार्य करीत आहेत. अध्यापनासोबतच त्यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड असून कविता लिहिणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा छंद आहे. त्यांच्या कवितांमधून आईचे प्रेम, स्त्रीमनाची हळवी भावना, नातेसंबंध, समाजातील वास्तव आणि जीवनातील संघर्ष यांचे प्रभावी चित्रण दिसून येते. साहित्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत २२ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी अवघ्या ६० मिनिटांत ५२ कविता सादर करण्याचा आगळा-वेगळा विक्रम केला. या विक्रमाची अधिकृत नोंद OMG Book of Records मध्ये करण्यात आली असून सेंदुरवाफा गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. मेरे सियाराम ही त्या ५२ कवितांची पुस्तकं प्रकाशित झाली आहे. ग्रामीण भागातून अशा प्रकारचा साहित्यिक विक्रम घडणे ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.
साहित्याबरोबरच सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व विकास क्षेत्रातही मंजुषा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या मिसेस स्टार महाराष्ट्र २०२५ या राज्यस्तरीय सौंदर्यस्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावून राज्यभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. याशिवाय विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये बेस्ट चार्मिंग, बेस्ट स्माईल यांसारखे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत हेल्पिंग हँड अँड वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली यांच्यावतीने त्यांना नवरत्न सन्मान पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या लेखनप्रवासाला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे. नुकतेच १४ डिसेंबर रोजी साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन, सीता ट्रस्ट, पुणे येथे आयोजित आई या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित ११२१ कवितांचा भव्य काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यामध्ये मंजुषा चित्रीवेकर यांच्या १० कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आईच्या मायेचे, त्यागाचे आणि निस्वार्थ प्रेमाचे हृदयस्पर्शी दर्शन या कवितांतून घडते. केवळ चूल व मूल न सांभाळता आपली समाजात एक वेगळी झाप पाडून आपण कीर्तीवंत झाले आहे.
नुकतेच ईडीयन काॅपीराईट प्रोडक्शन तर्फे त्यांना राज्यस्तरीय भारत सन्मान पुरस्कारसाठी निवड झाली असून 19 एप्रील 2026 ला सन्मानित करण्यात येणार आहे.मंजुषा ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असून एक आई उत्कृष्ट शिक्षीका, लेखिका, कवयित्री, मॉडेल अशा अनेक मानांकन त्यांनी मिळवले व आपण प्रतिभावंत आहोत हे समाजास दाखवून दिले. साध्या ग्रामीण कुटुंबातून पुढे येत सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सौ. मंजुषा चित्रीवेकर यांनी मिळवलेले यश आज अनेक युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे सेंदुरवाफा, पिंडकेपार गावासह संपूर्ण साकोली तालुक्याचे नावलौकिक वाढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या