चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर- तालुक्यातील बहुचर्चित ईंवळेश्वर क्रीडांगण व समपातळीत करणे कामातील भ्रष्टाचाराचे प्रकरण आता आ. भीमराव केराम यांच्याकडे गेले असून शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रफुल जाधव यांनी निवेदन सादर करून सदर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. सन 2024-25 अंतर्गत मौजे ईवळेश्वर ता. माहूर जि.नांदेड येथे क्रीडांगण व समपातळीत करणे व प्रकल्प योजनेच्या कामात अनियमितता केल्या बाबत व काम न करताच बिल उचलल्याने वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून संबधीत दोषींवर कारवाई करणे बाबत सादर केलेल्या निवेदनात प्रफुल जाधव यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड , शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प नांदेड, कमिशनर क्रीडा व युवा सेवा अदिसह संबधित प्रशासकीय विभागात सादर केलेल्या निवेदनाच्या छायाप्रती सह दि. ९ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय माहूर समोर सुरु केलेल्या उपोषणादरम्यान उपोषण सोडवताना दि. १० मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी त्यांना दिलेल्या लेखी आश्वासनाचे पत्र सह सदर प्रकरणातील भ्रष्टाचाराची संपूर्ण संचिका आमदार महोदयांच्या स्वाधीन केली. आ. केराम यांनी सदर प्रकरणी सखोल चौकशी करून प्रत्येकावर कारवाई करू, या भ्रष्टाचार प्रकरणात समाविष्ट असणाऱ्या एकाही अधिकारी कर्मचारी यांना सोडणार नाही असे आश्वासन शा.व्य.सदस्य प्रफुल जाधव यांना दिले आहे.
दस्तुरखुद्द आ.केराम यांनी सदर प्रकरणात व्यक्तिगत लक्ष घातल्याने या प्रकरणात काय कारवाई होते याकडे ईवळेश्वर येथील सुजाण नागरिकासह तालुक्यातील क्रीडाप्रेमी नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
सदर प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटकानेच अनियमितता केली असून त्याबाबतचे ठोस पुरावे माझ्याकडे उपलब्ध असून आमदार महोदयांना सादर केलेले आहेत याउपरही कारवाई न झाल्यास मा. उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे रिट याचिका दाखल करून भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रफुल जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.


0 टिप्पण्या