चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : ‘भोंदू’ अशोक खरातचा निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने तीव्र संशय व्यक्त करत, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेची तुलना त्यांनी मध्य प्रदेशातील गाजलेल्या 'व्यापम' घोटाळ्याशी केली आहे. व्यापम घोटाळ्याच्या तपासादरम्यान संबंधित ४० हून अधिक व्यक्तींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच धर्तीवर, डॉ. शेळकेचा अपघाती मृत्यू संशयास्पद असल्याचे वंचितने म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने याआधी २८ मार्च रोजी केलेल्या विधानाचा संदर्भ देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "अशोक खरात या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे उघड करू शकतात. त्यामुळे ताब्यात असतानाच संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो," अशी भीती पक्षाने व्यक्त केली होती. तसेच, प्रकरणातील बड्या नेत्यांची नावे बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही पक्षाने नमूद केले होते.
त्यावेळीही वंचित बहुजन आघाडीने अशोक खरातला उच्च सुरक्षा कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती. डॉ. शेळकेच्या मृत्यूनंतर, वंचितने ही मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.
मागणी काय आहे?
डॉ. जितेंद्र शेळकेच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जावी. अशोक खरातला कडेकोट सुरक्षा असलेल्या 'मॅक्सिमम सिक्युरिटी' कोठडीत हलवण्यात यावे.


0 टिप्पण्या