Ticker

6/recent/ticker-posts

“बापाच्या अश्रूंना न्याय; २४ तासांत बदलीचा आदेश!”

परिवहन मंत्र्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय;

मानवतेचा जिवंत प्रत्यय


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कोल्हापूर :कधी कधी शासनव्यवस्थेतही संवेदनशीलतेचा स्पर्श झाला की, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात आशेचा दिवा प्रज्वलित होतो—याचाच प्रत्यय कोल्हापूर-सांगली मार्गावर पाहायला मिळाला. एका थकलेल्या, अधू पायाने चालणाऱ्या बापाने आपल्या मुलाच्या बदलीसाठी थेट परिवहन मंत्र्यांचा ताफाच अडवला… आणि पुढे जे घडले, ते प्रशासनातील मानवतेचा हृदयस्पर्शी अध्याय ठरला.

रुकडी फाट्यावर काही ग्रामस्थांसह उभ्या असलेल्या नायकू गवाणे यांनी आपला मुलगा—एसटी चालक अमोल गवाणे—याच्या बदलीसाठी कळकळीची विनंती केली. आपल्या उतारवयात आधार असलेला मुलगा जवळ असावा, ही साधी पण अत्यंत भावनिक मागणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडली.

ग्रामस्थांनी हात दाखवताच मंत्र्यांनी ताफा थांबवण्याचे आदेश दिले. भर उन्हात स्वतः गाडीतून उतरून त्यांनी त्या वृद्ध बापाची व्यथा ऐकून घेतली. त्या क्षणी सत्ता नव्हे, तर संवेदनशीलता बोलत होती. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना फोन करून—“ताबडतोब बदलीचे आदेश काढा”—असा स्पष्ट निर्देश दिला.
आश्चर्य म्हणजे, दुपारी दिलेल्या या आदेशाची पूर्तता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाली आणि संबंधित विभागाला बदली आदेश प्राप्तही झाला.

दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनीही एका पत्राद्वारे व फोन करून या प्रकरणी परिवहन मंत्र्यांकडे अमोल गवाणे यांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन सिंधुदुर्ग विभागातून कोल्हापूर विभागात बदली करण्याची मागणी केली होती.  प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, श्री. अमोल नायकू गवाणे यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार कोल्हापूर विभागात करण्यात आली आहे. 

या संपूर्ण घटनेमुळे एका वडिलांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले, तर प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला.
“मानवतेला दिलेला मानच खरा सन्मान असतो,” याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या