Ticker

6/recent/ticker-posts

“ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी” ११वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड; महाविद्यालयाचा अभिमान


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे/ सोलापूर : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या इयत्ता ११वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची “ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी” नामांकित कंपनीत विद्यावेतनावर झालेली निवड ही मराठवाडा मित्रमंडळ संस्थेसाठी तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कौशल्य विकास विभागासाठी कौतुकास्पद असल्याचे मनोगत संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी (ता. १६) आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पवार, रेणू इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे कार्यकारी अधिकारी भारत मदने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम, विभागप्रमुख राजेंद्र खजुरे, डॉ. सुजाता शेणई, प्रा. कुंदन पवार, प्रा. संजयकुमार कांबळे, प्रा. वर्षा मेश्राम, प्रा. इंदिरा अभंग, प्रा. शरद तनपुरे आदी उपस्थित होते.
मराठवाडा मित्रमंडळाच्या ज्युनिअर कॉलेज (व्होकेशनल विंग), डेक्कन जिमखाना, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमातील इयत्ता ११वी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) उत्तीर्ण १५ विद्यार्थ्यांची ४० ते ६० दिवसांच्या “ऑन द जॉब ट्रेनिंग”साठी १३ एप्रिल २०२६ रोजी निवड करण्यात आली. ही निवड मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील रेणू इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. कंपनीकडून करण्यात आली असून, कंपनीचे मानव संसाधन कार्यकारी अधिकारी भारत मदने यांनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन निवड केली.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स विषयातील प्रात्यक्षिकांमध्ये एस.एम.डी. घटकांची ओळख, त्यांची प्रिंटेड सर्किट बोर्डवर जोडणी, तसेच अद्ययावत उपकरणांच्या साहाय्याने तपासणी प्रक्रिया शिकविण्यात येणार आहे. यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान व संगणकीय उपकरणांबाबत मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
प्रशिक्षणासाठी कंपनीकडून प्रति महिना १२,००० रुपये विद्यावेतन देण्यात येणार असून, वाहतूक व कॅन्टीन सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी १४ एप्रिलपासून कंपनीत रुजू होऊन प्रशिक्षणास सुरुवात केली आहे.
या प्रक्रियेत कंपनीच्या प्रतिनिधींनी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रयोगशाळेची पाहणी करून अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून मुलाखतीद्वारे त्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पालकांशीही शिक्षकांनी संवाद साधून कंपनीविषयी संपूर्ण माहिती दिली व त्यांच्या संमतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निकम यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करताना सांगितले की, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असताना विद्यावेतन मिळविणारे हे पहिले महाविद्यालय असल्याचा अभिमान आहे. यामध्ये शिक्षकांच्या परिश्रमाचे मोठे योगदान आहे.
अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्थेत १९८८ पासून किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू असून, आज या विभागाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी महाविद्यालयास “अ” दर्जा प्रदान केला असून, एन.सी.ई.आर.टी. भोपाळकडून ‘बेस्ट व्होकेशनल इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राज्यात प्रथमच हा मान मिळवणारे हे महाविद्यालय ठरले आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग उभारून यश संपादन केले आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद मोरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या