चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर, :राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळा यंदा गोंधळात आणि वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव नेहमी एकोप्याने विविध कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी तसेच आंदोलन करत असतात. मात्र यंदाच्या सोहळ्यात राजकीय हस्तक्षेपामुळे दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा रंगत आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादातून हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका समाजाच्या संस्थेमार्फत कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन महानगरपालिकेत बैठक घेऊन कार्यक्रम शासकीय पद्धतीने पार पाडण्याचे नियोजन केले.
मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात अनेक त्रुटी समोर आल्या. सामाजिक संघटनांच्या नावाखाली बोलावण्यात आलेल्या गरजू नागरिकांच्या निवास व स्टॉल व्यवस्थेचा अभाव असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. तब्बल ३५ लाख रुपयांचा निधी खर्च करूनही कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसून आला. हा खर्च फक्त नगरसेवकांना खुश करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही उपस्थितांकडून करण्यात येत आहे.
आदिवासी समाज सेवकांना निमंत्रण देऊनही त्यांच्यासाठी योग्य बसण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंचावरील गोंधळ, राज्यगीताऐवजी राष्ट्रगीत सादर होणे यांसारख्या चुका देखील घडल्याने उपस्थितांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या निधीतून राजमाता राणी हिराई यांचे स्मारक किंवा चौक उभारला असता तर अधिक योग्य ठरले असते, अशी भावना व्यक्त होत आहे. सांस्कृतिक विभागाकडून २५ लाखांचा निधी आणल्याची जाहिरात करण्यात आली असली, तरी तो निधी प्रत्यक्ष विकासकामांसाठी वापरला असता तर आदिवासी समाजावरील प्रेम अधिक स्पष्ट झाले असते, अशी टीका करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी टायगर संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, महिला विदर्भ अध्यक्ष सौ. मिनलताई आत्राम, उपाध्यक्ष हितेश मडावी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या