चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-हिमायतनगर येथील तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला आहे. येथील रहिवासी श्री. विकास पाटील देवसरकर यांचे सुपुत्र डॉ. ओंकार ममता विकास पाटील देवसरकर यांना ‘MBBS’ ही वैद्यकीय पदवी प्रदान करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (SSPM) मेडिकल कॉलेजचा पहिलाच ऐतिहासिक पदवी प्रदान समारंभ नुकताच सिंधुदुर्ग येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ. ओंकार यांना पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी एमयूएचएस (MUHS) नाशिकचे माजी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा संस्थापक विश्वस्त मा. श्री. नारायण राणे साहेब, संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. नीलम राणे मॅडम, आमदार मा. डॉ. निलेश राणे साहेब तसेच मंत्री मा. श्री. नितेश राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
डॉ. ओंकार यांच्या या यशाबद्दल हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. बाबुराव पाटील कोहळीकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. “ग्रामीण भागातील युवकाने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. डॉ. ओंकार हे भविष्यात रुग्णसेवेत आदर्श निर्माण करतील,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
परिवारात आनंदोत्सव
या यशस्वी क्षणी डॉ. ओंकार यांच्या भगिनी डॉ. भक्ती देवसरकर या देखील उपस्थित होत्या. एकाच कुटुंबात दोन डॉक्टर निर्माण झाल्यामुळे देवसरकर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हिमायतनगरसारख्या ग्रामीण भागातून कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणाचे शिखर गाठणाऱ्या डॉ. ओंकार देवसरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या यशाने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.


0 टिप्पण्या