चित्रा न्युज प्रतिनिधी
रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द येथे 'मी रमाई बोलतेय' या प्रसिद्ध एकपात्री प्रयोगाचा 200 वा प्रयोग 16 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सुप्रसिद्ध कलावंत व्याख्यात्या डॉ. गायत्री रामटेके यांनी रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हा भावस्पर्शी प्रयोग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
श्रावस्ती बुद्ध विहार, आंबेडखुर्द यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाबाईंच्या त्याग, समर्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या साथीचे जिवंत चित्र डॉ. रामटेके यांनी आपल्या ओघवत्या वाणीने उभे केले. रमाईंच्या संघर्षमय जीवनातील प्रत्येक प्रसंग त्यांनी हुबेहूब सादर करताच उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. गायत्री रामटेके यांचा आयोजकांच्या वतीने शाल, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. गायत्री रामटेके भावूक झाल्या. "आंबेडखुर्द गावाने जो मान, सन्मान आणि प्रेम दिलं, ते मी कधीच विसरणार नाही. 200 वा प्रयोग इथे सादर करायला मिळणं हे माझं कुशल कर्म आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी त्यांनी आद.सुरेंद्र कांबळे,आद.मिलिंद कांबळे,आद.संतोष कांबळे,आद.चंदकांत विश्वाम कांबळे आद . नीलेश कांबळे,आद.चंद्रकांत कांबळे तसेच श्रावस्ती बुद्ध विहार, आंबेडखुर्द आणि मुंबई येथील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर डॉ. गायत्री रामटेके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या