Ticker

6/recent/ticker-posts

मुंढे साहेब, साकोली तालुक्यात लक्ष द्यायला हरकत नाही


 * बेधडक कारवाईची नितांत गरज *

 रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
 साकोली : धाडसी, निर्भीड आणि कोणत्याही दबावाला न जुमानणारे नियमांचे बेधडक अधिकारी म्हणून ओळख असलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारला. सदर पदभार स्वीकारल्यानंतर  राज्यभर सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे अनेक भेसळखोर, गुटखा माफिया आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. केवळ तीन दिवसांत ५३ ठिकाणी धाडी, २५ एफआयआर, ३३ आरोपींना अटक आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त ही आकडेवारीच त्यांच्या कामाच्या वेगाची साक्ष देणारी आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि आता नुकतेच काल गुरुवारी ०४ जूनला भंडारा शहरात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवायांमुळे राज्यातील जनतेमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून केवळ कागदावर चालणाऱ्या मोहिमा प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी साकोली तालुक्यात लक्ष घालण्याची मागणी आता एकमुखाने नागरिक करीत आहे. प्रत्येक औषधी दुकानांमध्ये एकाच औषधीची वेगवेगळ्या किमती आकारून ग्राहकांकडून लूट केली जात आहे. साकोली तालुका हा तसा एकदम शांत. 
तालुक्यात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत शेकडो हॉटेल्स, मिठाई दुकाने, बेकरी, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, पानटपऱ्या, गुटखा विक्रेते, मसाला उत्पादक आणि खाद्यपदार्थांशी संबंधित मोठा व्यवसाय सुरू आहे. पण या व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कितपत सक्रिय आहे हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. साकोलीमध्ये भेसळयुक्त दूध, बनावट तूप, निकृष्ट दर्जाचे तेल, रंगमिश्रित मिठाई, कालबाह्य खाद्यपदार्थ, गोंदियातून येणारे उग्र वासांचे खाद्यपदार्थ, रासायनिक प्रक्रिया केलेली फळे, निकृष्ट मसाले आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत आहे. अनेक भागांमध्ये उघडपणे गुटखा आणि दिसत पानमसाल्याची विक्री होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकही सांगतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी कारवाई झाल्याचे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम बाजारपेठेवर नाही. यामुळेच अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक कार्यालयाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  नागरिकांच्या मते साकोली मध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज एमडी ड्रग्स प्रकरण उघडकीस आले होते तर प्रतिबंधित गुटखा इतक्या सहज उपलब्ध कसा होतो ? भेसळयुक्त पदार्थांची विक्री थांबत का नाही ? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सातत्यपूर्ण कारवाई का दिसत नाही ? आज राज्यभरात सुरू असलेल्या कारवायांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, इच्छाशक्ती असेल तर अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवता येते. मग साकोलीत असे का होत नाही.? हा प्रश्न जनतेला पडणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अन्न व औषधी विभाग पैशांची पॉकीटे घेऊन झोपा काढत होते. आता मात्र भ्रष्टाचारी लोक खाडकन जागे झाले आहेत. साकोली सेंदूरवाफा शहरात किंवा तालुक्यात केवळ भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही तर काही ठिकाणी वर्षानुवर्षे अवैध व्यवसाय कसे सुरू राहतात त्यामागे त्यांना संरक्षण देणारे कोण आहेत याचाही शोध घेणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील विविध विभागांना ज्या प्रकारे धडक कारवाईचे आदेश दिले त्याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा, औद्योगिक भाग, ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ युनिट्स, उत्पादक दुग्धव्यवसाय, मिठाई दुकाने, हॉटेल्स, गोदामे आणि गुटखा वितरण साखळी यांची व्यापक तपासणी झाली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या