आक्षेपार्ह जाहिरातींमुळे 45 हजारांचा औषधसाठा जप्त; 'DMR' कायद्याखाली कारवाई
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर:शहरातील जटपुरा गेट परिसरातील नामांकित पतंजली मेगा स्टोअर वर अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी धडक कारवाई केली. औषधे आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा 1954 चे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातींमुळे दुकानातील 45 हजार 700 रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
पंजाब नॅशनल बँकेशेजारी, हायवे वॉर्डातील मुख्य रस्त्यावरील 'मेसर्स शांती आय अँड सन्स' पतंजली मेगा स्टोअर. येथे लठ्ठपणा, दमा, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांवर 'गुणकारी' असल्याच्या आक्षेपार्ह जाहिरातींसह औषधे विक्रीस ठेवली होती.
औषधे व जादूटोणा विरोधी कायदा 1954 च्या कलम 3 आणि 4 नुसार अशा प्रकारच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी आहे.
या करवाहीत दिव्य शिलाजीत रसायन, फेरोफिट टॅबलेट, पतंजली द्राक्षासव, दिव्य अर्जुन घनवटी, दिव्य कार्डिओग्रिट गोल्ड, दिव्य मधोहर वटी, गिलोय घनवटी, महासुदर्शन घनवटी, दिव्य खदर नवक रसायन, आरोग्य वटी, ब्रॉन्कोम, दिव्य कुन्या भस्म मिश्रण आणि श्वासारी गोल्ड कॅप्सूल अशा एकूण 45,700 रुपयांचा साठा जप्त केले.
सहाय्यक आयुक्त एस. टी. सावंत म्हणाले,"ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी अशा जाहिरातींवर कठोर निर्बंध घातले आहेत. पतंजली दिव्य फार्मसी येथे तपासणी केली असता, आचार व कायद्याचे उल्लंघन आढळल्याने औषधसाठा जप्त करून औषधांपैकी तीन नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत."_
ही कारवाई नागपूर विभागाचे सहआयुक्त मिलिंद कासरलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. टी. सावंत व औषध निरीक्षक नीलेश उरकुडे यांच्या पथकाने केली.
---------------------- बॉक्स------------------
चंद्रपुरात पतंजली स्टोअरवर FDA चा दणका!
जटपुरा गेटवरील मेगा स्टोअरमधून 45,700 रु. ची औषधे जप्त. 'दमा, हार्ट बरा होतो' अशा जाहिराती भोवळ्या. DMR कायद्याखाली कारवाई. 3 नमुने लॅबमध्ये. ग्राहकांची दिशाभूल कराल तर खैर नाही!


0 टिप्पण्या