Ticker

6/recent/ticker-posts

सिगरेट, धुम्रपान, तंबाखूला ठाम नकार; निरोगी जीवनाचा स्वीकार !

आरोग्य केंद्र, सेवाभावी संस्थाची जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जनजागृती सप्ताह मोहीम; नागरिकांनी घेतली व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अतनूर :-"तंबाखू खाऊ नका रे भावांनो, आयुष्य वाया घालवू नका रे..." या प्रबोधनपर गीताच्या ओळींनी उपस्थितांना अंतर्मुख करत तंबाखूमुक्त समाजाच्या निर्मिंतीचा संदेश देणारा जळकोट तालुक्यातील अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ३२ गावे, ५ उपकेंद्राच्या गाव, वाडी, तांडा, वस्तीत प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर/अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था, वसुंधरा महिला मंडळ, जिजामाता महिला मंडळ अतनूर यांचा व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथे आयोजित कार्यक्रमाला, आरोग्य कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्र, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर/अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था, वसुंधरा महिला मंडळ, जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख हे होते. व्यासपीठावर वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती कोळ्ळे, वरिष्ठ लिपीक रोखपाल पांडुरंग सुर्यवंशी, आरोग्य निरीक्षक शेख सलमान, आरोग्य सहायक बालाजी सोनटक्के, आरोग्य सहाय्यिका दिपा मांगीलवार, प्रेमिला म्हेत्रे, राठोड, मौला शेख, आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समितीचे संस्थापक अध्यक्ष, राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.संध्या बाळासाहेब शिंदे अतनूरकर, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मिणीबाई पांडुरंग सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख यांनी उपस्थितांना तंबाखू, गुटखा तसेच सर्व प्रकारच्या मादक पदार्थापासून दूर राहण्याची सामूहिक शपथ दिली. यावेळी उपस्थितांनी केवळ स्वतः व्यसनमुक्त राहण्याचाच नव्हे, तर समाजातही तंबाखूविरोधी जनजागृती करण्याचा निधींर व्यक्त केला. तंबाखूविरोधी जनजागरण मोहीम व जनजागृती कार्यक्रमांतून व्यसनामुळे होणारी शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक हानी प्रभावीपणे उलगडण्यात आली.
प्राथमिक आ.केंद्र अतनूर येथील सर्व आरोग्य पर्यवेक्षिका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य कर्मचारी, परिचारिका परिचर, सर्व आरोग्य कर्मचारी वृंद, परिचर ,सर्व गटप्रवर्तक व सर्व आशा कार्यकर्ती, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक जनजागृती, जाणीवजागृती सेवाभावी संस्था, महिला मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम केवळ वैयक्तिक आरोग्यापुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होतो. त्यामुळे तंबाखू, गुटखा, सिगरेट मुक्ती समाजाची निर्मिती ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा प्रभावी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
" तंबाखूची एक पुडी क्षणिक आनंद देऊ शकते; पण तिची किंमत अनेकदा संपूर्ण आयुष्याला चुकवावी लागते. त्यामुळे तंबाखूला नकार आणि निरोगी जीवनाला होकार देणे हीच काळाची गरज आहे.” आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर. 
डॉ.सकलेन शेख यांनी तंबाखू सेवनामुळे उद्भवणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक धोक्यांची सविस्तर माहिती दिली. तोंडाचा कर्करोग, फुप्फुसांचे विकार, हृदयविकार, पक्षाघात यांसह अनेक जीवघेण्याऱ्या आजारांचे मूळ तंबाखूमध्ये दडलेले असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः युवकांनी क्षणिक मोहापोटी आयुष्याशी खेळू नये, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र शासन नियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी तंबाखूमधील निकोटीन या व्यसनाधीन करणाऱ्या घटकाची माहिती देताना सांगितले की, निकोटीनची सवय एकदा लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे व्यसनाची सुरुवातच होऊ न देणे हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्थेचे अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर म्हणाले, "व्यसन ही एका व्यक्ती पुरती मर्यादित समस्या नसून ती संपूर्ण कुटुंब आणि समाजावर परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. निरोगी, सृदृढ आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपरोक्त सर्व सेवाभावी संस्था, महिला मंडळ, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जनजागृतीच्या क्षेत्रात यापुढेही सातत्याने कार्यरत राहील."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंग सुर्यवंशी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या