Ticker

6/recent/ticker-posts

वरोरा तहसीलचा 'सेतू'च तुटला! वेळेचा विसर, जनतेचा त्रास

सकाळी 10 ला उघडणारे केंद्र 11.30 ला 'जागे'; शेतकरी-विद्यार्थी उन्हात होरपळले



चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा: राज्य शासनाने 'आपले सरकार' पोर्टलद्वारे सेवा गतिमान करण्याच्या वल्गना केल्या, पण वरोरा तहसील कार्यालयातील सेतू केंद्रानेच शासनाच्या वेळेच्या GR ला हरताळ फासला आहे. सकाळी 10 वाजता सुरू होणे बंधनकारक असलेले हे केंद्र रोज 10.30 ते 11 वाजेनंतर उघडत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या शेकडो नागरिकांचे हाल होत आहेत.

सेवा' की 'सजा'? नागरिकांचा आक्रोश: 

उत्पन्न, रहिवासी, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी शेतकरी, महिला, विद्यार्थी सकाळी 9 पासून रांगेत उभे राहतात. शेतीची कामे, मजुरी सोडून, बसभाडे खर्च करून आलेल्या नागरिकांना 11 वाजेनंतर खिडकी उघडल्यावर कर्मचाऱ्यांचे दर्शन होते. उन्हातान्हात तासनतास वाट पाहून अनेकांचे अर्जही त्या दिवशी स्वीकारले जात नाहीत.
  
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय कार्यालये सकाळी 9.45 ते सायं 6.15 पर्यंत सुरू राहणे अपेक्षित आहे. सेतू केंद्र सकाळी 10 वाजता सुरू होणे बंधनकारक आहे. मात्र वरोरा तहसीलमध्ये 'साहेब आल्यावरच कारभार' हा अलिखित नियम झाला आहे.

नायब तहसीलदारांचे अजब उत्तर:

याबाबत नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांना विचारले असता ते म्हणाले,"सेतू केंद्रातील ऑपरेटरला कामाचा अनुभव नाही. तक्रार आली आहे. कर्मचाऱ्यांना वेळ पाळण्याच्या सक्त सूचना दिल्याचे नायब तहसीलदार यांनी सांगीतले आहे.

अनुभव नसलेल्या ऑपरेटरला नेमलेच कसे? नागरिकांच्या महत्त्वाच्या दाखल्यांचे काम शिकाऊ उमेदवाराकडे देण्याची परवानगी कोणत्या GR ने दिली?,'सूचना' देऊन पगार घेणार का? रोज उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी? की फक्त 'सूचना' देऊन वेळ मारून न्यायची?, नायब तहसीलदारांनाच जर केंद्रावर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर तहसीलदार कार्यालयात करतात काय?

'आपले सरकार' फेल, 'आमचे हाल' पास

शासनाने सेतू केंद्र सुरू केले जनतेच्या सोयीसाठी. पण वरोरा येथे हेच केंद्र जनतेच्या छळाचे केंद्र बनले आहे. नोकरीसाठी, शिक्षणासाठी लागणारे दाखले वेळेत न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

सेतू केंद्र सकाळी 10 वाजता काटेकोरपणे सुरू करा.,अनुभवी व कायमस्वरूपी ऑपरेटर नेमा.,गेल्या 1 महिन्यात उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचे CCTV फुटेज तपासून पगारकपात करा. अशी नागरिकांची मागणी होत आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर आता 'वेळेचा विसर' पडलेल्या या यंत्रणेला वठणीवर आणले नाही, तर 'सेतू' योजनेचाच बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही.

-------------------------------------------------
वरोरा तहसील: 'सेतू' केंद्र की 'छळ' केंद्र?

सकाळी 10 ऐवजी 11.30 ला उघडते खिडकी. शेतकरी-विद्यार्थी उन्हात होरपळले. GR ची पायमल्ली. नायब तहसीलदार म्हणतात, 'ऑपरेटरला अनुभव नाही'! अरे, मग नेमलाच कशाला? पगार 'अनुभव' घ्यायचा देता का? 'आपले सरकार'चा फज्जा. तहसीलदार साहेब, झोपेतून उठा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या