Ticker

6/recent/ticker-posts

बुलढाण्यातील अन्नत्याग आंदोलनाला भद्रावतीतून पाठिंबा!



क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; कर्जमाफी, पिक विम्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम

रवीकांत तुपकरांच्या आंदोलनाला समर्थन; 'मागण्या मान्य न झाल्यास लाखोंच्या संख्येने आंदोलन करू' - प्रफुल थेरे यांचा इशारा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती:महाराष्ट्रातील शेतकरी आज आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला असून शेती उत्पादनाचा वाढता खर्च, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती व कर्जाचा वाढता बोजा यामुळे मोठ्या अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवा आघाडी प्रफुल अनिल थेरे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, हक्काचा पिक विमा व इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी रवीकांत तुपकर यांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून शासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा.
"पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य व वेळेत नुकसान भरपाई मिळेल यासाठी कठोर पावले उचलावीत. रवीकांत तुपकर यांच्या मागण्या पूर्ण करण्याची तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाची सर्व जबाबदारी राज्य सरकारची राहील," असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी निवेदन देतांना प्रफुल थेरे,शैलेश गोंडे,नंदू गो़डे, नरेंद्र नागपूरे, प्रदिप डोंगे, विलास राजुरकर, राजेश मत्ते, रोशन घोरफडे,स्वप्निल डाहूले, धन्नू मत्ते, विपिन मत्ते, किसन थेरे, शंकर थेरे, मिथुन, शुभम सुर, विनोद चिकटे, शंकर मत्ते, सुहास चिकटे, गणेश जिवतोडे, स्वप्निल क्षिरसागर आणि कोंढा येथील  गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

__________________________________

कर्जमाफीसाठी भद्रावतीतूनही एल्गार!

बुलढाण्यातील रवीकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पाठिंबा. प्रफुल थेरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन. 'सरसकट कर्जमाफी, हक्काचा पिक विमा द्या, नाहीतर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू' असा इशारा. शेतकरी आक्रमक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या