Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय बोडीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीचा संघर्ष.....


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-लाखनी तालुक्यातील मचारणा येथील जांभुळबोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय बोडीवर झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छीमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागांचे लक्ष वेधले असून बोडीचे मूळ नैसर्गिक स्वरूप पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा सरसावली आहे.
माहितीनुसार, गावातीलच सेवानिवृत्त शिक्षक गिरीधारी गौतम ठवकर यांनी बोडीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. त्यामुळे बोडीचे पात्र उथळ झाले असून पावसाळ्यात गावातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भविष्यात गावात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार लाखनी, गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग तसेच पालांदूर पोलीस ठाण्याला निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर 13 जून रोजी तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि पालांदूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मात्र, भूमी अभिलेख विभागातील नोंदीतील त्रुटी आणि महसूल विभागाच्या संथ भूमिकेमुळे अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया रखडल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. महसूल विभागाने केलेला पंचनामा हा वस्तुस्थितीशी सुसंगत नसून अतिक्रमणधारकाला लाभदायक ठरणारा असल्याचा दावा ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे.
यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित पंचनाम्याबाबत असहमती नोंदवत त्यावर स्वाक्षरी केल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीच्या अथक प्रयत्नांनंतरही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनात नाराजीचे वातावरण असून, बोडीवरील अतिक्रमण हटवून नैसर्गिक जलस्रोताचे संरक्षण करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या