(शीतला माता मंदिरात हवन व गुरु पूजनाने गुरुपौर्णिमा पर्व उत्साहात संपन्न)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : पावन पर्व गुरुपौर्णिमेचे आयोजन योगभारती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शीतला माता मंदिर सभागृहात श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २ वाजता वैदिक मंत्रोच्चारासह हवनाने झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर ठीक ४ वाजता गुरुजनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ईश्वरलालजी काबरा, प्रमुख वक्ते प्रा. सुमंत देशपांडे, योगभारती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख योग शिक्षक श्री. शाम कुकडे, पतंजली योग समितीचे अध्यक्ष श्री. महादेव बांगडकर, श्री. सतराम कौरानी, श्री. वामन गोंधुळे, सहायक योग शिक्षक श्री. चिंधुजी बुधे यांच्यासह अन्य मान्यवर अतिथी तसेच मोठ्या संख्येने योग साधक व साधिका उपस्थित होते.
प्रथम मान्यवर अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शिष्यांनी आपल्या गुरुजनांचा पुष्पगुच्छ, शाल व दुपट्टा देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सुमंत देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “निर्मळ मन आणि शुद्ध चित्ताने केलेल्या साधनेतून जीवन सफल होते. गुरुजनांची निरंतर आराधना हीच आपल्या जीवनाची दिशा निश्चित करते. योगसाधना ही प्रत्यक्षात परमेश्वराची खरी प्रार्थना आहे.”
श्री. शाम कुकडे यांनी गुरुंची महती व महत्त्व अधोरेखित करत सर्वांना योगाशी जोडण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. सतराम कौरानी, श्री. ईश्वरलाल काबरा, श्री. महादेव बांगडकर, श्री. वामन गोंधुळे, श्री. चिंधुजी बुधे आदी मान्यवरांनीही गुरुंच्या महतीचे व जीवनातील गुरुंच्या महत्त्वाचे विवेचन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. अतुल वर्मा यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. पुरुषोत्तम वैद्य यांनी केले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने गुरु, शिष्य, योग साधक-साधिका तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात भक्तीभाव आणि गुरु महिमेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमासाठी मंदिर कमिटी ट्रस्टच्या वतीने (श्री. ईश्वरलाल काबरा) मंदिर सभागृह उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे सचिव श्री. धनराज धुर्वे तसेच सर्व योग साधक-साधिकांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या