चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-टिळक विद्यालय, खंडाळा येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षक-पालक सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या निमित्ताने शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यात शैक्षणिक ध्येयधोरणांबाबत संवाद साधण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर होते. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कांबळेजी, बोन्डे गावचे उपसरपंच गोंधळेजी, तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक पी. एन. कापगते सर, डी. डी. तुमसरे सर, ए. आर. कुंभरे सर, आर. एम. भेंडारकर सर, ए.पी. काशीवार, सर, एम. यु. मेश्राम मॅडम, एन डी टेंभुर्णे, सुनीलजी मेंढे व इतर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक निर्वाण सर यांनी शैक्षणिक वर्षाचे नियोजन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिष्यवृत्ती परीक्षांचे महत्त्व आणि वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला. पालकांनी पाल्यांच्या अभ्यासात सक्रिय रस घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
पालक सभेचे औचित्य साधून विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए आर कुंभरे सर यांनी तर आभार प्रदर्शन एम. यु. मेश्राम मॅडम यांनी केले.
सभेच्या शेवटी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार व चहाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.


0 टिप्पण्या