जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा निर्णय, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर: भारतीय हवामान खात्याने 29 जुलैसाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी 29 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर हवामान केंद्राने 29 आणि 30 जुलै या दोन दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे.
*प्रशासनाच्या महत्वाच्या सूचना:*
1. *घरातच सुरक्षित राहा* - सखल भाग, अंडरपास, पूरग्रस्त रस्त्यांनी प्रवास टाळा
2. *वाहन जपून चालवा* - कमी दृश्यमानतेत वाहन चालवू नका
3. *वीजेपासून दूर रहा* - झाडाखाली, लोखंडी शेडमध्ये थांबू नका, विद्युत उपकरणे बंद ठेवा
4. *नदी-नाले ओलांडू नका* - पाणी वाहत असल्यास पुलावरून जाऊ नका
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष 07172-250077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
---------------------------------------------
*चंद्रपूरला उद्या रेड अलर्ट*
*हवामान खात्याच्या रेड अलर्टनंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी 29 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली. 29-30 जुलैला अति मुसळधार पावसाचा इशारा. नागरिकांनी घरात राहावे आणि 07172-250077 या क्रमांकावर आपत्कालीन मदत मागावी.*


0 टिप्पण्या