Ticker

6/recent/ticker-posts

नागझिरा, एकोडी रोडवरील प्रवासी निवारे झालेत जनावरांचा गोठा ?


साकोली: रवि भोंगाने 

स्वच्छ बस स्थानक, सुंदर बस स्थानक असे शासनाचे अलीकडच्या काळातले ब्रीद आहे. मात्र ग्रामीण भागातील बस थांब्याकडे लक्ष टाकले की, हे बस थांबे आहेत की जनावरांचे गोठे अशी म्हणायची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. त्यातही तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या नागझिरा, एकोडी फाट्यावरील  बस थांबा (प्रवासी निवारे ) याकडे दुर्लक्ष होत आहे हे त्याहूनही नवल. राष्ट्रीय महामार्गाला लागून आणि मुख्य चौकात हे बस थांबे  ( प्रवासी निवारे ) नागझिरा रोडला, एकोडी फाट्याला लागून आहेत. या प्रवासी बस थांब्याचा आसरा घेऊन नागरिक, विद्यार्थी रोज मोठ्या प्रमाणात पिटेझरी, तुडमापुरी, वडेगाव, खांबा, जांभळी तर एकोडी फाट्यावरून तुमसर, तिरोडा पर्यंत गावाला ये-जा करतात. या दरम्यान प्रवासी थांब्यावर प्रवासी थांबून आपल्या गावाच्या बसची प्रतीक्षा करीत असतात. मात्र ही बस थांबे ( प्रवासी निवारे ) इतकी घाणेरेडी अवस्थेत आहेत की नाकाला रुमाल बांधून येथे उभे राहावे लागते. रंगरंगोटी नाही, आतमध्ये कचरा, कुजका वास या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या बस थांब्यात केव्हा साप, विंचू आणि इतर कीटक प्राणी येतील याची शाश्वती नाही. त्यामुळे ही बस थांबे एक प्रकारची जनावराचा गोठा झालेली आहेत. शासन जनावरांचा गोठा बांधण्यासाठी सुद्धा शासकीय योजनेतून निधी देत असते. मात्र प्रवाशांचा आधार असलेल्या बस थांब्याकडे कोणीही लक्ष देत नाही. या बस थांब्याची जबाबदारी आगार विभागाची नाही काय ? असेल तर या प्रशासनाने गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? 
पावसाळा असल्यामुळे आणि पाऊस आला की बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना या बस थांब्यात आतमध्ये शिरकाव केल्याशिवाय पर्याय नसतो. नाईलाजाने पाऊस आला की या बस थांब्याचा आसरा घ्यावा लागतो. जनावरांच्या गोठ्याचे रूप आलेल्या बस थांब्याचे नवे रूपांतर केव्हा होईल ? अशा बस थांब्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून ही बस थांबे नव्या रूपात उपलब्ध करून देण्याची मागणी आता प्रवासी करू लागलेली आहेत.
----------------------------------------------
नागझिरा रोड वरील, एकोडी रोडवरील आणि आणखी काही प्रवासी निवारे हे आमच्या विभाग अंतर्गत येतात. दरवर्षी या प्रवासी निवारा दुरुस्ती संबंधी आम्ही आमच्या वरिष्ठ विभागाला माहिती देत असतो. तरीही या प्रवासी निवारा दुरुस्तीकरिता आमचा विभाग प्रयत्नशील आहे.

श्रीकांत चोपकर. 
आगार व्यवस्थापक, साकोली.
----------------------------------------------

प्रवासी बसने प्रवास करतात त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे आर्थिक स्तोत्र ( उत्पन्न ) तयार होत असते. मात्र ज्या ठिकाणांवरून आर्थिक स्तोत्र निर्माण होते तेथेच प्रवासी निवारे नाहीत. जिथे आहेत ती गलिच्छ स्वरूपात आहेत. यापूर्वी  आमदार फंडातून ही प्रवास निवारे बांधली जायची. पण आता जबाबदारी राज्य परिवहन मंडळ विभागाची आहे. तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यावर जिथून राज्य परिवहन महामंडळाची बस जाते तिथे विद्यार्थी, नागरिक ताटकळत उभे राहतात. तालुक्यात अनेक ठिकाणे आहेत की जिथे प्रवासी निवारे नाहीत. येथे प्रवासी निवारे का देऊ नयेत? ज्या रस्त्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला आर्थिक स्तोत्र मिळतो त्याकडेच दुर्लक्ष करण्याचे कारण काय ?  यावेळी मुख्य रस्त्यांवरील प्रवासी  निवाऱ्याची यादी करून प्रवासी निवारे विभागाने तयार करून द्यावेत.
 
विजय साखरे.
तंटामुक्त

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या