Ticker

6/recent/ticker-posts

स्व.दादासाहेब काळमेघ एक लोकाभिमुख व्यक्तिमत्व


जननायक स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या दि .२९ जुलै २०२६ रोजी असलेल्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

     स्व.दादासाहेब काळमेघ एक
      लोकाभिमुख व्यक्तिमत्व

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे माजी अध्यक्ष, महान व्यक्तिमत्त्व,थोर समाजसुधारक,लोकाभिमुख व्यक्तिमत्व जननायक स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या दि .२९ जुलै २०२६ रोजी असलेल्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ॥ 
        गरीब विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ,लोकनेते स्व. दादासाहेब काळमेघ यांचा जन्म चौसाळा ग्रामात गरीब कुटुंबात झाला . घरात गरिबी असूनही त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर उच्च शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या जीवनाला खरा आकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या विचारांमुळे मिळाला. डॉ.पंजाबराव देशमुखांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी खर्च केले. दादासाहेबांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (Vice-Chancellor) म्हणून अत्यंत यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता. कुलगुरू पदावर असताना त्यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.अचूक निर्णयक्षमता, कणखर भूमिका आणि दूरदृष्टी हे त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख पैलू होते. त्यांनी विदर्भातील नामांकित 'श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती' चे अध्यक्षपद १० वर्षे भूषवून संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला. त्यांच्या कार्यकाळात वैद्यकीय,अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील अनेक महाविद्यालये सुरू झाली.  समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उच्च शिक्षण पोहोचविणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते. दादासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत भारदस्त, प्रेमळ, महान आणि संवेदनशील होते. ते केवळ एक प्रशासक नव्हते, तर एक लोकाभिमुख आणि जनतेशी नाळ जोडलेले नेते होते. त्यांना भजन आणि कीर्तनाचा प्रचंड छंद होता, या माध्यमातून जनप्रबोधन करून जनजागृती केली.
             कार्यालयीन काम संपवून ते स्वतः खेड्यापाड्यात जाऊन कीर्तन करीत असत आणि ग्रामानाथांशी संवाद साधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे ग्रामाचा सर्वांगीण विकास कसा करायचा ते प्रासादिक भाषेत कीर्तनातून सांगत असत. याच लोकसंपर्कामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेला ते नेहमी 'आपला माणूस' वाटायचे. त्यांच्या मनात विरोधकांबद्दल किंवा कोणाबद्दलही कधी द्वेषभावना नव्हती. त्यांनी कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्यासारख्या अनेक थोर कलावंतांना आणि साहित्यिकांना नेहमीच मनापासून आश्रय दिला होता.
       दादासाहेबांनी 'अभंग' नावाचे स्वतःचे एक पुस्तकही प्रकाशित केले होते,ज्यातून त्यांचे वैचारिक आणि साहित्यिक पैलू समोर आले.  त्यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आणि चुकीच्या व्यवस्थेला नेहमीच कडाडून विरोध केला.नागपूर आणि अमरावती परिसरातील शैक्षणिक चळवळीचा ते मुख्य कणा मानले जातात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात 'स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान' स्थापन करण्यात आले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज 'दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालय' (Dental College) दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देत आहे.
         दरवर्षी २९ जुलै रोजी दादासाहेबांची पुण्यतिथी विदर्भात मोठ्या आदराने साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्व.दादासाहेब काळमेघ यांचे एकोणतिसावें पुण्यस्मरण स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान तर्फे स्व. दादासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्याच्या निमित्ताने २९ वा पुण्यस्मरण कार्यक्रम छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे सायंकाळी ५ . oo वाजता आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन प्र. देशमुख (अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) ,प्रमुख पाहुणे 
मा. प्रा. डॉ. श्री. अविनाश वा. आवलगावकर (कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती), समाजाप्रबोधनकार मा. ह.भ.प. श्री. सत्यपाल महाराज (सप्तखंजिरीवादक),
मा. श्री. शैलेश दि. पांडे (मुख्य संपादक,तरुण भारत, नागपूर), मा. श्री. सुभाष त्र्यं. बेलसरे (माजी कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, नागपूर) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला दरवर्षी हजारोंच्या संख्येने उपस्थिती असते हे विशेष. 
       दादासाहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. दादासाहेबांनी नेहमीच स्वावलंबन आणि सामाजिक समतेचा संदेश दिला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर कसे गाठावे,याचे जिवंत उदाहरण दादासाहेब होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य नवीन पिढीतील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक उत्तम आदर्श आहे.  विदर्भाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडणीत त्यांचे योगदान कधीही न विसरता येणारे आहे.अशा या महान जननायकाने  घेतलेल्या कार्याचा वसा आजही त्यांचे सुपुत्र मा. हेमंतराव , मा.शरदराव पुढे चालवित आहेत.
      जननायक स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या दि.२९ जुलै २०२६ ला असलेल्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
        
डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख
एज्युकेशनल नॅशनल अवार्ड प्राप्त 
              साहित्यिक
       प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
       काँग्रेस नगर,अमरावती.
      भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या