Ticker

6/recent/ticker-posts

'सहज सुचलं' समूहाच्या शिरपेचात मानाचा तुरा: नुपूर मोडके आणि टीना उराडे यांना 'महिला सत्कार समारंभ २०२६' पुरस्कार जाहीर!

राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

चंद्रपूर : वुमेन्स २४ चॅनेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महिला सत्कार समारंभ २०२६' अंतर्गत कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार नुपूर दिलीप मोडके आणि प्रख्यात नाट्यकलावंत टीना (राशी) यशवंत उराडे यांची प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 'सहज सुचलं' या साहित्यिक व कला समूहाच्या या दोन्ही गुणवंत कलावंतांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे समूहाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्या खरोखरच सर्व स्तरांतून अभिनंदनास पात्र ठरल्या आहेत.
​समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी आगामी ११ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर येथील नागपूर रोडवरील कन्नमवार भवन (सि.डी.सि.सि. बँक) येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वुमेन्स २४ चॅनेलच्या संपादिका प्रीती कुमरे शाहू यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून हा गौरव सोहळा संपन्न होत असून 'सहज सुचलं' समूहाने आयोजकांचे विशेष आभार मानले आहेत. दोन्ही कलावंतांचे कलाक्षेत्रात अत्यंत भरीव योगदान असून त्यांची कामगिरी नवोदितांसाठी प्रेरणादायी असल्याचे समूहाच्या मुख्य मार्गदर्शिका तथा समाजसेविका मायाताई कोसरे (नागपूर) व ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांनी आपल्या संयुक्त शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
​या यशाचा आनंद द्विगुणित करताना दोन्ही विजेत्या कलावंतांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या कुटुंबीयांसह 'सहज सुचलं' समूहाच्या मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांना दिले आहे. तसेच समूहाच्या सहमार्गदर्शिका शैला चिमड्यालवार (सेवानिवृत्त नायब तहसीलदार), साधना धकाते, मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडके, सहसंयोजिका नलिनी आडपवार, ज्येष्ठ लेखिका विजया भांगे, रजनी रणदिवे, विजया तत्वादी, विद्या पिंजरकर, चंदा कामडी, अर्चना समर्थ, प्रा. लता हिवरे, सरोज हिवरे, वैजयंती गहुकर, प्रा. वैशाली राऊत आणि प्रा. राजश्री पाटील यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे व खंबीर पाठिंब्यामुळेच हा सन्मान मिळाल्याची कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण समूहात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या